गणेशोत्सव आणि बकरी ईद सणांच्याकाळात
यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात
- आयुक्त तथा
प्रभारी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर
कोल्हापूर, दि.22 : गणेशोत्सव, गणेश विसर्जन मिरवणूक आणि बकरी ईद हे सण उत्साही वातावरणात, शांततेत व सुव्यवस्थेत पार पडावेत, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रभारी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी आज येथे केली.
गणेशोत्सव आणि बकरी ईद या सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत पी. शिवशंकर बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, मोनिका सिंह, पोलीस उप अधीक्षक अनिल पाटील, शहर पोलीस उपअधिक्षक भरतकुमार राणे, वाहतूक निरीक्षक
आर. आर. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त एस. एम. देशमुख, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रिय
अधिकारी वर्षा कदम, तहसिलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी
तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव तसेच गणेश विसर्जन मिरवणूक कालावधीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि दक्षता घेण्याची सूचना करुन महापालिका आयुक्त तथा प्रभारी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर म्हणाले, गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, सार्वजनिक ठिकाणी वातावरणातील आवाजाची पातळी योग्य ठेवून ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणांनी कायद्याची कठोर, अंमलबजावणी करावी, ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लघंन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली. घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात या कायद्याची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गणेशोत्सवामध्ये नागरिकांनी
गणेश मूर्तींच्या विसर्जनाबरोबरच निर्माल्यामुळे प्रदुषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषण होणार नाही याचीही दक्षता घेण्याची सूचना या बैठकीत
करण्यात आली. गणेशोत्सव काळात फटाके, डॉल्बी सिस्टीम, आदींमुळे होणारे ध्वनी प्रदुषण
तसेच पर्यावरण प्रदुषण या बाबत न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन
करण्याची सूचनाही महापालिका आयुक्त तथा प्रभारी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केली.
गणेशोत्सव मिरवणूक मार्ग
निश्चित करणे तसेच या मार्गावर पोलीस सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, वाहनांचे पार्कीग,
वीज पुरवठा, रस्ते दुरुस्ती, प्रदुषण नियंत्रण, रुग्णवाहिकांची सुविधा आदीं उपाययोजनांवर
अधिक भर देण्याची सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी केली. गणेशोत्सव व गणेश
विसर्जन मिरवणूक कालावधीत तसेच बकरी ईद या सणाबाबत न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन
करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
सार्वजनिक गणेश मंडळांनी
गणेश विसर्जनाच्यावेळी प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच गणेशमुर्तींचे विसर्जन
करावे. मिरवणूक निश्चित केलेल्या मार्गावरुन शांततामय वातावरणात पार पाडाव्यात तसेच
शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी गणेश उत्सव आणि बकरी ईद हे दोन्ही सण शांततामय वातावरणात
साजरे करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिका आयुक्त तथा प्रभारी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केले. बकरी ईद निमित्त पशुसंवर्धन विभागासह सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
यावेळी गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक तसेच बकरी
ईद सण शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागानी केलेल्या
नियोजनाचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.