इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २३ सप्टेंबर, २०१५



आधार कार्डशी शिधापत्रिका जोडण्यात
कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम
-- जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे

     कोल्हापूर, दि. 23 : आधार कार्डशी शिधापत्रिका जोडण्याच्या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या संगणकीकृत डाटा एन्ट्री प्रक्रियेमध्ये अनेक दिवस आघाडीवर राहून आज कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी आज येथे बोलतांना सांगितले.
कोल्हापूर शहरातील सर्व रास्त भाव दुकानदार आणि अंगणवाडी सेविका यांच्यासह पुरवठा विभागाच्या क्षेत्रिय यंत्रणेची एकत्रित सभा शाहू स्मारक भवन येथे झाली या सभेत श्री. आगवणे यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, अशाच एकत्रित सभा इचलकरंजी येथे आणि त्या पाठोपाठ प्रत्येक तालुक्यात घेण्यात येऊन आधारकार्डसह शिधापत्रिका संगणकीकरणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करुन 'स्मार्ट रेशन कार्ड' 'बायोमेट्रीक पध्दतीने शिधावस्तुंचे वितरण' राज्यात सर्व प्रथम सुरु करण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्यास मिळावा यासाठी पुरवठा विभाग जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली  सतत प्रयत्नशील आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील एकूण 26लाख 26 हजार 653 अन्न सुरक्षा लाभार्थ्यांपैकी (National Food Security Act-NFSA) कायद्यांतर्गत एकूण 13 लाख 13 हजार 977 म्हणजे निम्म्याहून अधिक लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका त्यांच्या आधारकार्ड क्रमांकाशी बँक अकाऊंट तपशीलासह जोडण्यात आल्या आहेत. (म्हणजे 13 लाख 13 हजार 977 इतक्या लाभार्थ्यांचे UID Seeding झाले आहे) APL वर्गातील कुटुंबांना शासनाकडून ऑक्टोबर 2014 पासून रास्त भाव दुकानांतून धान्य दिले जात नसल्याने त्यांच्याशी घरोघरी संपर्क साधून  त्यांचे UID Seeding करण्याचे काम आव्हानात्मक असून आधारकार्ड क्रमांकाच्या संकलनासाठी रास्त भाव दुकानदारांच्या मदतीला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांचा सहभाग घेण्यात येत आहे. जिल्ह्यात सुमारे 300 डाटा एन्ट्री ऑपरेटर्सची मोठी यंत्रणा आधार सिडींगसह शिधापत्रिकांची डाटा एन्ट्री करण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यरत करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आधार कार्डशी शिधापत्रिका जोडण्याच्या संगणकीकृत डाटा एन्ट्री प्रक्रियेमध्ये कोल्हापूर प्रथम क्रमांकावर असून याकामी जिल्हयातील अंगणवाडी सेविका, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स तसेच पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी सांगितले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.