शुक्रवार, २४ जून, २०१६





महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा :
1 जुलैपर्यंत लेखी सूचना सादर करा
-          पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पहिल्या टप्प्यासाठी 72 कोटी रुपये

कोल्हापूर, दि. : 24 - महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी एकूण 255 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील 72 कोटी रुपये पहिल्या टप्प्यासाठी देण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर नियोजित आराखड्यावर आज जनतेची मते जाणून घेण्यात आली. 1 जुलैपर्यंत जनतेने लेखी सूचना सादर कराव्यात. त्यानंतर या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.
महालक्ष्मी विकास आराखड्यांतर्गत येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला पूरक सूचना आज व्यक्त झाल्या असल्याबाबत समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, राज्य शासन जिल्ह्यातील अपूर्ण आणि प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरकरांसाठी श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पर्यटन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींची मते जाणून घेण्याबरोबरच नागरिकांच्या सूचनांचाही विचार व्हावा, अशी सूचना पुढे आली. त्यानुसार आज ही बैठक घेण्यात आली. या माध्यमातून प्रशासनाचा आराखडा जनतेपुढे यावा, हा एक दृष्टीकोन होता. या आराखड्याविषयी लेखी सूचना देण्यासाठी आणखी आठ दिवसांचा अवधी देण्यात येत आहे. येत्या 1 जुलैपर्यंत जनतेने त्यांच्या सूचना मांडाव्यात. त्यानंतर हा आराखडा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात येईल. मुख्यमंत्री महोदय या बाबत सकारात्मक असून, प्रामुख्याने दर्शन मंडपाचा मार्ग पहिल्या टप्प्यात तडीस नेण्याचा आमचा मानस आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मंदिर विकास आराखड्याच्या सोयीसाठी बिंदू चौक येथील कारागृह कळंबा कारागृहात स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाच्या दिशेने असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाल्क्ष्मी मंदिर विकास आराखडा एकूण 255 कोटी रुपयांचा आहे. पहिल्या टप्प्यात 72 कोटी रुपयांचा निधी असून त्यामध्ये तीन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. भाविकांची सोय, पार्किंग आणि भक्त निवास, तसेच मंदिर विकास व संवर्धन आणि तिसरी म्हणजे मंदिराचे सौंदर्यीकरण अशा बाबी यात अंतर्भूत आहेत.
महालक्ष्मी मंदिराचा विकास करताना पहिल्या दिवसापासूनचे त्याच्या देखभाल कृती आराखड्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मंदिरात देश परदेशातून भाविक येत असतात. त्यामुळे या आराखड्यात मंदिराची पारंपरिक वास्तू आणि नवीन आराखडा हे परस्परपूरक असावेत. कामाची कला दर्जेदार व इमारत सुंदर असावी. तसेच, भवानी मंडप परिसर नो व्हेईकल झोन व्हावा.
महाल्क्ष्मी मंदिर विकास आराखड्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खुली चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करून खासदार धनंजय महाडिक यांनी आराखडा तयार करताना पुढील 25 वर्षांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. 
आमदार सतेज पाटील म्हणाले, हा आराखडा पुढील 100 ते 200 वर्षे टिकणार आहे. त्यामुळे दर्शनरांग, सीसीटीव्ही, बसेसची व्यवस्था आणि महत्त्वाचे म्हणजे वृद्ध व्यक्तींसाठी सरकते जिने (एस्कलेटर्स) आदि बाबींचा सखोल विचार व्हावा.
महापौर अश्विनी रामाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, महाल्क्ष्मी मंदिर विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या सूचना असतील तर त्यांनी त्या 1 जुलैपर्यंत नियोजन कार्यालय, तसेच महानगरपालिकेत सादर कराव्यात.
यावेळी  माजी नगरसेवक आदिल फरास, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांच्यासह अन्य नागरिकांनी मते व्यक्त केली. मंदिर परिसरात प्रसाधन गृहांची संख्या वाढवावी, परिसरातील दुकानदारांना विश्वासात घ्यावे, नो व्हेईकल झोन असावे, भक्त निवासाची जागा, पार्किंगच्या जागा, ओपन अँपी थिएटर, मोफत अन्नछत्र, क्रीडांगणाचा विकास आणि त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, किरणोत्सवाला अडथळा न आणता विकास करण्यात यावा, मंदिराभोवतीच्या 5 चौकात स्कायवॉक, विजेच्या तारांचे भूमिगत पद्धतीने नियोजन, पर्यायी वीजव्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक नियमन, राज्य तपास यंत्रणेकडून आराखड्याची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी, परिसरातील वाहतूक नियमनासाठी शाळांचे महानगरपालिका शाळांच्या इमारतीत स्थलांतर, भक्त निवासासाठी विनावापर शासकीय इमारतींचा उपयोग करून घ्यावा, कपीलतीर्थमध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन, लाईट अँड साऊंड शो, परिसरात वृक्षारोपण अशा बाबींचा समावेश होता.
फोरस्ट्रेस संस्थेच्या अजय भोरे यांनी सादरीकरण केले. यामध्ये दर्शन मंडप, मुखदर्शन मार्ग, बिंदू चौक ते भवानी मंडप आकाशी मार्ग, भक्त निवास, बिंदू चौक, सरस्वती चित्रपटगृह आणि व्हीनस कॉर्नर येथे पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी आरोग्य सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन सुविधा, पर्यटकांसाठी वाहतूक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, दिशादर्शक फलक आदि बाबींची माहिती त्यांनी दिली.
यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

राज्यात नवीन रस्त्यांसाठी 50 हजार कोटी रुपये मंजूर
-          पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
-           
कोल्हापूर, दि. 24 :  केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी काल फेसवाईज 97 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मान्य केले. त्यातील 50 हजार कोटी रुपये नवीन रस्त्यांसाठी आणि 47 हजार कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे दिली. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईत काल महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पांच्या मान्यतेसाठी एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीच्या अध्यक्षपदी आपण असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकात दादा पाटील म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी काल टप्पेनिहाय 97 हजार कोटी रुपये निधी महाराष्ट्राला मान्य केला आहे. त्यातील 50 हजार कोटी रुपये नवीन रस्त्यांसाठी आणि 47 हजार कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मंजूर करण्यात आला आहे. या सगळ्याचे डीपीआर तयार करायला सांगितले आहे. त्यानुसार सगळे निविदा प्रक्रिया, कार्यादेश आदि प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बास्केट ब्रीजसाठी 120 कोटी
दरम्यान, शहराच्या प्रवेश ठिकाणी बास्केट ब्रीज करण्यासाठी काल 120 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
शहराच्या प्रवेश ठिकाणी चांगला एंट्री पॉइंट असावा, अशी चांगली कल्पना खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली होती. त्याबाबतचा आराखडा दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यांनी तो मान्य केला आहे. मुंबईत काल महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पांच्या मान्यतेसाठी एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत या बास्केट ब्रीज प्रकल्पासाठी 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पावसाळ्यात चार महिन्यात त्याचा आराखडा, अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया पूर्ण होईल व दिवाळीनंतर काम सुरू करण्यात येणार आहे. हा संपूर्ण निधी केंद्र शासन देणार आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.