सोमवार, ६ जून, २०१६




श्री क्षेत्र जोतिबा मंदीर परीसर विकास आराखड्‌यांतर्गत
पहिल्या टप्यात 25 कोटीच्या आराखड्यास मान्यता
-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
श्री महालक्ष्मी  विकास आराखड्याबाबत लवकरच व्यापक बैठक
कोल्हापूर दि. 6 :  श्री क्षेत्र जोतिबा मंदीर, वाडी रत्नागिरी परीसर विकास आराखड्‌या अंतर्गत पहिल्या टप्यातील 25 कोटीच्या तर  माणगाव परिसर विकास आराखड्‌यापैकी पहिल्या टप्यातील 5 कोटीच्या आराखड्यास जिल्हा पर्यटन समितीने  मान्यता दिली असून श्री महालक्ष्मी मंदिर परीसर विकास आराखड्याबाबत लवकरच व्यापक बैठक घेऊन लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सूचना विचारात घेऊन व्यापक आराखडा तयार केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले.
 जिल्हास्तरीय पर्यटन समितीची बैठक महाराणी ताराबाई सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 श्री  क्षेत्र जोतिबा मंदीर, वाडी रत्नागिरी परीसर विकासाचा 155 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून यापैकी पहिल्या टप्यातील 25 कोटीच्या आराखड्‌यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून यामध्ये दर्शन मंडप, सेंट्रल प्लॉझा, पार्किंग, टॉयलेट काँम्प्लेक्स, सांडपाणी आदी कामांचा समावेश आहे. तर माणगाव परीसर विकास आराखडा सुमारे 100 कोटीचा असून यापैकी पहिल्या टप्यात 5 कोटीच्या आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. यामध्ये तक्या, प्रवेशद्वारे, भव्य स्मारक, तलाव विकास, शाळा इमारत विकास, मैदान विकास आदी कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्यातील निधी शासनाकडून प्राधान्याने उपलब्ध होणार असून ही कामे तात्काळ सुरु करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
 राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ,लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय विकास आराखडा यावर सविस्तपणे चर्चा करण्यात आली. संग्रहालयाचा 15 कोटी 60 लाखाचा आराखडा असून यापैकी पहिल्या टप्यात प्राधान्य क्रमाच्या कामांचा समावेश करुन सुमारे 3 ते 4 कोटीचा आराखडा तात्काळ तयार करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी 121 कोटीचाआराखडा तयार करण्यात आला असून ही कामे प्राधान्याने सुरु करण्यात आली असून ती गतिमान असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
 श्री महालक्ष्मी मंदीर परिसर विकासाचा 72 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून हा आराखडा निश्चित करताना मंदीर आणि भाविक यांना केंद्रबिंदू मानून हा आराखडा निश्चित करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ते म्हणाले, श्री महालक्ष्मी मंदीर परीसर विकास आराखडा अंतिम करण्यापूर्वी जनतेची मते आजमावने गरजेचे आहे यासाठी लवकरच केशवराव भोसले नाट्यागृहामध्ये व्यापक बैठक घेऊन लोकप्रतिनिधी तसेच जनतेच्या रास्त सूचना विचारात घेतल्या जातील. आराखड्याबाबतच्या सर्वांच्या सूचना जाणून घेऊनच हा आराखडा अंतिमरित्या निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 यावेळी मान्यवर लोकप्रतिनिधींनीही आपापल्या सूचना या बैठकीत केल्या, मान्यवरांच्या सुचनावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत करुन बैठकीचा विषय विशद केला. बैठकीस मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सरपंच तसेच देवस्थान समितीचे सदस्य, पर्यटन समितीचे सदस्य आणि सर्व संबंधित विभांगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 0 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.