जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळणे आवश्यक
-
पालकमंत्री चंद्रकांत पाटील
मुलींची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई
कोल्हापूर दि. 24 : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक लोक कल्याणकारी योजना कार्यरत असून या योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहचून जनतेला या योजनांची माहिती देणे व या योजनांचा जनतेला लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. गारगोटी येथे पंचायत समिती भुदरगड नूतन प्रशासकीय इमारत उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांच्या हस्ते झाले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा विमल पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, भुदरगड पंचायत समितीचे सभापती विलास कांबळे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार दिनकर जाधव, माजी आमदार नामदेव भोईटे, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबा देसाई, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिश जगताप, गट विकास अधिकारी जी. आर. कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, पंचायत समिती भुदरगड नूतन प्रशासकीय इमारतीच्या स्वरूपात भुदरगड तालुक्यातील जनतेला विकासाचे नवे दालन उपलब्ध झाले असून यामुळे तालुक्यात विकास कामांना गती मिळणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या अधिकाधिक योजनांचा लाभ जनतेला मिळावा यासाठी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन जनतेच्या गरजा ओळखायला हव्यात. ग्रामपंचायतीचा विकास तर देशाचा विकास हे सूत्र लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतीला थेट निधी उपलब्ध करून दिला आहे. याचा लाभ ग्रामस्थांच्या विकासासाठी होणे गरजेचे आहे. शासनाने जनतेच्या मागणी आधी जनतेची गरज ओळखून विकास साधण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्या दृष्टीने समन्वयातून सर्वांनी एकत्रित येऊन विकास साधने गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुलींची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईईपालकमंत्री
कोल्हापूर-सांगली सारख्या पुरोगामी व प्रगत जिल्ह्यात मुलींच्या छेडछाडीचे निंद्य प्रकार घडत असून त्यामुळे मुलींच्या आत्मत्यांसारखे धक्कादायक प्रकार घडत आहेत. बऱ्याच ठिकाणी मुलींना शिक्षण सोडून घरी बसावे लागले आहे. अशा अपप्रवृत्तीला आळा बसावा यासाठी शाळा, महाविद्यालय येथे पोलिसांची गस्त वाढविणे तसेच या ठिकाणी तक्रार पेटी बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधितांविरीद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भुदरगड तालुका हा शिक्षण , निर्मलग्राम बाबत अव्वल आहे. अलीकडे हा तालुका कुपोषण मुक्तही झाला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातूनही अनेक विकास कामे सुरु आहेत. पंचायत समिती भुदरगड येथील नूतन प्रशासकीय इमारतच्या अनुषंगाने जनतेला सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत. शासनाने खासदार आदर्श आरोग्य ग्राम योजना जाहीर केली असून जिल्ह्यात या योजनेच्या अनुषंगाने भरीव काम करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती विलास कांबळे यांनी केले तर आभार उप सभापती राजनंदा बेलेकर यांनी मानले. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सर्व समित्यांचे सभापती, सदस्य, व भुदरगड पंचायत समितीचे सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.