इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर कठोर कारवाई करा - जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी तालुकास्तरावरही संनियंत्रण समिती कार्यान्वित करा



कोल्हापूर, दि. 18 : आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करण्याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करा, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या निवडणूका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी  वातावरणात पार पाडव्यात यासाठी सर्व निवडणूक यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून निवडणूक विषयक जबाबदारी काटेकोरपणे पारपाडावी, निवडणुकीच्या कामात टाळाटाळ आणि हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिला.
            जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली  झाली.   त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवडणूक नोडल ऑ‍फिसर विवेक आगवणे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संनियंत्रण समिती तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देऊन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, प्रत्येक तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यान्वित केलेल्या व्हिडीओ ग्राफी सर्व्हेलियन्स पथक, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम,  भरारी पथक, चेक पोस्ट पथक यामध्ये योग्य समन्वय ठेऊन त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या कार्यक्षमपणे पार पाडल्या जातील याची दक्षता घ्या.  बोर्ड, बॅनर, होर्डिग अशा जाहिराती तात्काळ काढण्याची कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा नंबर 0231-2651950 असा आहे.
पाहणी करुनच मतदान केंद्रे निश्चित करा-जिल्हाधिकारी
  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची पाहणी करुनच ती निश्चित करा, असे स्पष्ट निर्देश देऊन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, मतदान केंद्रे आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी. पाणी, लाईट, रॅम्प आणि  सुरक्षितता आदी गोष्टींची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 67  गटासाठी तर पंचायत समितीच्या 134 गणांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत असून या निवडणूका मुक्त, निर्भय, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणूकीच्या क्षेत्रात घडणाऱ्या महत्वाच्या घटना, मिरवणूका, प्रचार फेऱ्या, सभा अथवा आचारसंहितेचा भंग होईल अशा घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. भरारी पथक स्थापन करुन पैशाच्या व मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभन ठरतील अशा व अन्य संशयास्पद हलचालींवर लक्ष ठेवून आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाईन
 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी ए.बी. फॉर्म देणे बंधनकारक केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाईन भरण्यात येणार असून या फॉर्मची प्रत स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.  यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत कक्षांची स्थापना करण्यात आली असून त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला. याबाबत अधिक दक्ष राहण्याची सूचनाहीत्यांनी केली.
जिल्हाभर मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविणार-जिल्हाधिकारी
यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती अभियान गतीमान करण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, मतदार जागृतीसठी नव मतदार तसेच विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरावर मोठ्यां गावामध्ये रॅली काढण्याबरोबरच मतदान जागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.
कोल्हापुरात 25 जानेवारीला मतदार जागृती रॅली
          येत्या 25  जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनी कोल्हापूर शहरासह सर्व तालुक्याच्या ठिकाणी  मतदार जागृती रॅलीचे आयोजन करावे. या रॅलीमध्ये नवमतदारांबरोबरच सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. कोल्हापूर शहरात 25 जानेवारी रोजी
 मतदार जागृती रॅली काढण्यात येणार असून  या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस विद्यार्थी, विद्यार्थींनी व महिला बचत गट, नेहरु युवा केंद्राचे युवक, बीएलओ तसेच नागरिकांचा सहभाग घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले. ही रॅली बिंदू चौकातून निघून पुढे शिवाजी पुतळा, महानगरपालिकामार्गे दसरा चौक येथे येऊन या रॅलीचा समारोप होईल. याच दिवशी सकाळी 10 वाजता शाहू स्मारक येथे नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण, उत्कृष्ठ काम केलेल्या बीएलओ तसेच मतदार जागृतीसाठी घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
          यावेळी जिल्हा परिषद, पंचयात समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता व अन्य निवडणूक  कामकाजाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
            या बैठकीस पोलीस निरीक्षक एन.एच.भुजबळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिथडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर, विक्रीकर उप आयुक्त सुनिल कानगुडे, अग्रणी बँकेचे अधिकारी रवींद्र बार्शीकर यांच्यासह सर्व संबंधित  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
           

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.