इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने खेळासाठी एक तास द्यावा -- जिल्हा परिषद अध्यक्षा विमलताई पाटील



        




कोल्हापूर दि. 9 : सुदृढ आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाने खेळासाठी एक तास द्यावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमलताई पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा -2017 चे येथील पोलीस क्रीडांगणावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमलताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमलताई पाटील म्हणाल्या, खिलाडूवृत्ती जोपासल्यास खेळाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहते. यासाठी कर्मचाऱ्यांनी खेळांमध्ये लक्ष द्यावे.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार प्रास्ताविकात म्हणाले, नवीन वर्षाची जोशपूर्ण सुरुवात क्रीडा स्पर्धेने होत आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे शारिरीक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे गेल्या तीन वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम करणारी राज्यात कोल्हापूरची जिल्हा परिषद एकमेव आहे. देशात प्रथम शिंगणापूर येथे संकुल उभारले आहे असे उपक्रम चांगले आहेत.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करुन सार्वजनिक क्रीडा शपथ घेण्यात आली तसेच क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. 3 दिवस चालणाऱ्या या क्रीडास्पर्धेचा 11 जानेवारीस बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. 
यावेळी लहान मुलाने हलगीचा ठेका धरताच सर्वजण मंत्रमुग्ध झाले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या मुलांचे कौतुक करुन त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क्रीडा संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली.
फुटबॉल, कुस्ती, कबड्डी नसानसात भिनलेल्या कोल्हापूरवासियांच्या तिसऱ्या वर्षीच्या या क्रीडा संचलनात जिल्हा परिषदेचे कृषि, लेखा व वित्त, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामपंचायत, पंचायत समिती, महिला व बाल कल्याण, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पन्हाळा पंचायत समिती बहिरेवाडीच्यावतीने केलेल्या संचलनात घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, मावळे तसेच हातकणंगले पंचायत समितीच्या मल्हारी मार्तंड वेशभूषेतील कर्मचारी, पन्हाळ्याच्या चव्हाणवाडीचे हलगीपथक, भारताच्या विविध जिल्ह्याच्या भागातील नागरिकांचे विविधतेतून एकता दशर्विणारे पेहराव परिधान केलेले स्त्री-पुरुष कर्मचारी, अजित मगदूम लिखित तुमच्यासंग मला येवू द्या की.. मलाबी खेळाला येवू द्या की.. या गाण्यावर धनगरी वेशभूषेतील नाच करीत संचलन करणारे कर्मचारी, लहान मुलींचे झांज पथक, टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी वेशभूषेतील कर्मचाऱ्यांमुळे वेगळे चैतन्य निर्माण झाले होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.