इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

आई-वडिलांनी, पालकांनी सज्ञान मुलांना वाहनाबरोबर स्वयंशिस्तीचे धडे द्यावेत -- जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी





       
कोल्हापूर दि. 9 : आई-वडिलांनी, पालकांनी सज्ञान मुलांकडे वाहन देताना स्वयंशिस्तीचे धडे देणे आवश्यक व गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
28 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान 9 जानेवारी ते 23 जानेवारी पंधरवड्यांतर्गत आपली सुरक्षा, कुटुंबाची रक्षा, रस्ता सुरक्षेवर लक्ष द्या या जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
            योवळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी पुढे म्हणाले, रस्त्यावरील अपघातात प्रत्येक तासाला 2 मृत्यू हे प्रमाण महाराष्ट्रात आहे. दुसऱ्यांच्या चुकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. वाहनमालकांनी त्यांच्या वाहनचालकांची मानसिकता विचारात घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकांची सुरक्षा त्याच्या कुटुंबाची सुरक्षा ही जाणीव लक्षात घेवून वाहन चालविण्याचा परवाना देतांना काटेकोर तपासणी गरजेची आहे.
            जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असली पाहिजे, अतिघाई, व्यसनाधिनता, अहंकार,स्वयंशिस्तीचा अभाव ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. कायद्याची जाणीव जागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
            प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार म्हणाले, वाहनांना ओव्हरटेकप्रसंगी अहंकाराच्या प्रभावामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होऊन बुध्दीची स्थिरता राहत नाही त्यामुळे अहंकार हे अपघाताचे मोठे कारण आहे. यासाठी सहदारीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
            राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनिल रामानंद म्हणाले, बहुतांशी अपघातात डोक्यास गंभीर इजा झाल्याने मृत्यू असून, 20 ते 35 वयोगटात पुरुषांमध्ये हे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर शिस्तबद्धपणा, अनुशासन, वैयक्तिक जीवनात स्वयंशिस्त आवश्यक असून, दुचाकी वाहन चालविताना डोक्यास हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन ही चळवळ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
            सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे म्हणाले, 2 लाख 94 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे. स्त्यावरच्या अपघातात, वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या ही काळजीची बाब आहे. 85 टक्के अपघात चालकांच्या चुकीमुळे होतात. 1995 पासून अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यास सुरुवात करण्यात आली असून, अपघात टाळण्यासाठी ट्रॅफिक सेफ्टी ऑडीटचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये 18 ठिकाणे अपघात प्रवण ठिकाण म्हणून निश्चित केली आहेत या ठिकाणी टेस्टींग ट्रप ही नवीन प्रणाली सुरु करण्यात येत असून याप्रणालीतून चालकांच्या चुका निदर्शनास येतील. त्यामुळे चांगले चालक निर्माण होतील.
            उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा प्रस्ताविकात म्हणाले, आपली सुरक्षा कुटुंबाची रक्षा या कार्यक्रमात 80 कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यातील 20 कार्यक्रम शाळा, महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार असून, 22 कार्यक्रम साखर कारखाने, 10 शिबिरे याबरोबरच  विविध कार्यक्रमात रस्ते तपासणी, हेल्मेट, शिटबेल्ट, रिफ्लेक्टर, रिक्षा तपासणी, नगरपालिकेमार्फत विशेष प्रबोधन कार्यक्रम, विविध स्पर्धा, निबंध, चित्रकला पोस्टर्स स्पर्धा अशा जलजागृती कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे.
यावेळी रस्ता सुरक्षा अभियानाबाबतच्या चिन्हांचे व साहित्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ यांनी केले. शहर पोलीस वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ यांनी आभार मानले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.