इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत टेस्ट साईट - जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी



कोल्हापूर, दि. 19 : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाईन भरणे बंधनकारक केले आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने www.testsecgp.mahaonlinegov.in  ही टेस्ट साईट सुरु केली असून या टेस्ट साईटवर राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी सराव करावा, जेणेकरुन नामनिर्देशनपत्र भरतेवेळी अडचण येणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवडणूक नोडल ऑ‍फिसर विवेक आगवणे, प्रांताधिकारी किर्ती नलवडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यावेळी नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाईन भरण्यात येणार असून या फॉर्मची प्रत स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.  यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या शिवाय राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी www.testsecgp.mahaonlinegov.in  ही टेस्ट साईट सुरु केली असून या टेस्ट साईटसाठी विभाग औरंगाबाद व जिल्हा बीडचा वापर करुन सराव करण्यास प्राधान्य द्यावे. या बाबतीत काही अडचणी असल्यास संबंधित तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी केले. या निवडणुकीमध्ये नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी ए.बी. फॉर्म देणे बंधनकारक केले असल्याचेही डॉ. सैनी यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी शपथपत्रामध्ये सादर केलेली स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, गुन्हेगारी पार्श्वभुमी तसेच शिक्षण याबाबी मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी परस्परांमध्ये द्वेष किंवा तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करु नये, सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया यांचा वापर करुन प्रलोभने किंवा लाच देता येणार नाही, पोस्टर्स, बॅनर, फलक लावण्यासाठी महाराष्ट्र मालमत्ता विरुपन प्रतिबंध अधिनियम 1995 चे काटेकोर पालन करावे, तसेच निवडणूक प्रचाराकरीता प्राण्यांच्या वापरास प्रतिबंध केला आहे. निवडणूक प्रचाराच्या मिरवणूका तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित कार्यक्रमामध्ये 14 वर्षा खालील मुलांचा वापर करता येणार नसल्याचेही  यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मिडिया वरील पेड जाहिरातीसाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शी  वातावरणात पार पाडव्यात यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोटरपणे पालन करुन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे.   असे आवाहन करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा नंबर 0231-2651950 असा आहे. याबरोबरच तालुकास्तरावरही नियंत्रण कक्ष, तक्रार निवारणकक्ष,  व्हिडीओ ग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, स्टॅटिक सर्व्हेलन्स  पथक  सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  
यावेळी जिल्हा परिषद, पंचयात समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, ऑनलाईन नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरणे, निवडणूक खर्चाची मर्यादा व हिशोब आदीबाबींवर माहिती देण्यात आली व चर्चा करण्यात आली.            
               

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.