इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

राजर्षी शाहू शिक्षण क्रांतीदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी व चित्ररथाने शहर दुमदुमले राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पालकमंत्र्यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन रॅलीची सुरुवात








        कोल्हापूर, दि. 21 : 21 सप्टेंबर या राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त आज शहरातून शालेय मुला मुलींची प्रभात फेरी आणि विविध शाळांनी काढलेल्या सजीव चित्ररथांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. सामाजिक परिवर्तनासाठी केवळ शिक्षण ! समाज सुधारक राजा शाहू महाराज! शिक्षण कार्य हेच महान कार्य! शिकलेला माणूस कधीही कमजोर नसतो अशा विविध घोषवाक्यांनी, हालगी आणि लेझिम पथक, झांज पथक, पोलीस बँडने सारा परिसर दुमदुमून गेला.
            राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने 21 सप्टेंबर या राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ व प्रभात फेरीचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याहस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, डॉ. जयसिंगराव पवार, अशोक चौसाळकर, शिवाजी विद्यापीठाचे सह कुलसचिव विलास नांदवडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
            21 सप्टेंबर 2017 रोजी राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनास 100 वर्षपूर्ण होत असून यानिमित्त राजर्षी शाहूंचे कार्य आणि विचार जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट व शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 23 सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने आणि चित्ररथ रॅलीने सुरुवात करण्यात आली.    
            दसरा चौकातून सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीस, चित्ररथ रॅलीत जिल्ह्यातील विविध शाळा, हायस्कुलमधील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शालेय मुलींनी सादर केलेल्या लेझिम खेळांने उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या. पोलीस बँड हे या रॅलीतील मुख्य आकर्षण होते. शालेय झांज पथकाने परिसर दुमदुमून टाकला. ही प्रभात फेरी व चित्ररथ रॅली आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका, सीपीआर हॉस्पिटल मार्गे जावून या रॅलीचा शाहू स्मारक भवन येथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शालेय मुला मुलींची राजर्षी शाहू महाराज यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणासाठी केलेल्या कायद्यास 100 वर्ष होत असून त्या निमित्त शिक्षणाचे महत्व आणि राजर्षी शाहूंचे शिक्षणाचा कायदा या अनुषंगाने विविध घोषवाक्याचे फलक हे एक वेगळे आकर्षण होते.
            राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त दसरा चौक येथून निघालेल्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीमध्ये शहर व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थींनी आणि मान्यवरांचा सहभाग लक्षणीय होता. आजच्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीमध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे सजीव चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये वि.स.खांडेकर  प्रशालेने शाहू महाराजांचे शिक्षण‍ विचार, मुस्लिम हायस्कुलने शाहू महाराजांचे शिक्षण, प्रायव्हेट हायस्कुलच्या चित्ररथामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण, राजाराम हायस्कुलच्या चित्ररथामध्ये शाहूंचे जन्मस्थळ, महाराष्ट्र हायस्कुलने लेक वाचवा, देश वाचवा चित्ररथ, उषा राजे हायस्कुलने लोक शिक्षण गरजेचे, साई हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजने प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे, स.म. लोहिया हायस्कुलने शाहू महाराजांच्या कार्यावर आधारी चित्ररथ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कुलने कुस्ती तसेच देशभुषण हायस्कुलने शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरी या विषयावर सजीव चित्ररथ तयार केले होते. या सजीव चित्ररथांना पाहण्यासाठी नागरीकांनी जागो जागी गर्दी करुन चौका चौकात त्यांचे स्वागत केले.
            या शालेय मुलांच्या प्रभात फेरी व चित्ररथ रॅलीच्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शाहू स्मारक भवनचे कृष्णाजी हारुगडे, वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डींगचे गणी आजरेकर, कादर मलबारी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.