इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

राजर्षी शाहूंचे निर्णय आजही राज्याला दिशादर्शक - पालकमंत्री चंद्रकांत पाटील




कोल्हापूर, दि. 21 :  राजर्षी शाहू महाराजांनी अत्यंत क्रांतीकारक असा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 100 वर्षांपूर्वी केला. त्यांचे सर्व निर्णय आजही कल्याणकारी राज्यांसाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            राजर्षी शाहू शिक्षण क्रांतीदिन 2017 शताब्दी समारंभ विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. यामध्ये राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टद्वारे प्रकाशित व डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू छत्रपतींचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा या पुस्तिकेचे प्रकाशन शाहू स्मारक भवन येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार होते.  यावेळी महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अशोक चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणताही कायदा कसा डिझायिन करावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे होत. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याच्या समाधानकारक अंमलबजावणीपर्यंत आपण आजही पोहोचू शकलो नाही. पण राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला होता. केवळ कायदे करुनच चालत नाही तर त्याच्या यशस्वीतेसाठी वाटचालीतील अडथळे दुर करण्यासाठीही त्यांनी उपाय योजना केल्या होत्या. अशा द्रष्ट्या राजाचे आपण वारस आहोत हे अत्यंत अभिमानास्पद आहे. असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आजही केरळ सारखे एखादेच राज्य 100 टक्के साक्षर आहे. महाराष्ट्रात एकूण बजेटच्या 30 टक्के म्हणजे जवळपास 47 हजार कोटी रुपये शिक्षणावर खर्च करुनही आपण 100 टक्के साक्षर होऊ शकलो नाही. याबाबतचे या निमित्ताने चिंतन होणेही आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
            डॉ. जयसिंगराव पवार यांनी विद्येचा महिमा पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणारे महापुरुष म्हणजे महात्मा फुले होय तर शिक्षणाची मक्तेदारी मोडून काढून शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे सांगून बहुजनांचे उध्दार करणारे दुसरे महात्मा म्हणजे राजर्षी शाहू महाराज असे सांगून ते म्हणाले, शिक्षण हे सुसंस्कृत राष्ट्राच्या गरजा भागवते या विचारातून 97 टक्के जनसमुदायासाठी राजर्षी शाहूनी शिक्षणाची दारे खुली केली. 1917 ला संस्थांनचे उत्पन्न 15 लाख रुपये होते त्यावेळी प्राथमिक शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च केला. त्यामुळेच 1922 पर्यंत 22 हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत होते. 1922 ला महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी 3 लाख रुपये खर्च केले होते. राजर्षी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रात्र शाळा चालू केल्या. त्यांनी केलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हा माणसाला मनुष्यत्व प्रदान करणारा कायदा आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जनतेने हिरहिरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
            जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी राजर्षी शाहू महाराजांची शिक्षणाबद्दलची सकारात्मक जाण व त्याद्वारे समाजातील सर्व घटकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचे पर्यत्न हे अद्वितीय होते असे सांगून शिक्षणातून जनकल्याणाचा हेतु साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सर्व शाळा व ग्रामपंचायतींमध्ये राजर्षी शाहूंचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा या पुस्तिकेचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगून प्रशासन व जनसहभाग यांच्याद्वारे राजर्षी शाहूंचे कार्य आणि विचार लोकांपर्यंत अधिक व्यापक पध्दतीने पोहोचविण्यासाठी वर्षभर असे कार्यक्रम सुरु राहतील असे सांगितले.
            महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी महपालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या राजर्षी शाहू शिष्यवृत्ती व अन्य उपक्रमांबद्दल माहिती दिली.
            यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. आभार विवेक आगवणे यांनी मानले. सुत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले.


0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.