इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

डॉल्बीमुक्त मिरवणूक महाराष्ट्रात इतिहास घडवेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील









प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या
श्रींच्या पालखी पुजनाने पालकमंत्र्यांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ


कोल्हापूर दि. 5 :- कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची आरती होऊन कोल्हापूर गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
25 ऑगस्टपासून जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असून आज अंनत चतुदशीच्या दिवशी विसर्जन मिरवणूकीस खासबाग मैदानापासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखी घेऊन सुरुवात केली. यावेळी महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, श्री तुकाराम माळी तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
फुलांनी सजविलेल्या आकर्षक पालखीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पुजन झाल्यानंतर पोलीस बँडसह श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल- ताशा पथकांनी परिसर दणाणून गेला.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांनी मिरजकर तिकटीपर्यंत पालखी आणली. पालखी सोहळ्याची मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडणारी अशीच होती. गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मिरवणुकीचा जल्लोष दिसत होता. ढोल आणि ताशा पथकाचे सुत्रबध्द वाद्य तसेच मंडळांची केलेली विद्युत रोषणाई हे विसर्जन  मिरवणुकीचे आकर्षण होते.  
 यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्यावतीने कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गावरील अंबाबाई एक्सप्रेसचा केलेला देखावा मिरवणुकीत असल्याने एकूण विसर्जन मिरवणुकीचे अंबाबाई एक्सप्रेस हा देखावा नागरीकांचे आणि भाविकांचे मुख्य आकर्षण ठरले. या मिरवणुकीत श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होवून ढोल वाजवून ताल धरला. उपस्थितींनी उत्स्फुर्तपणे दाद दिली.
डॉल्बीमुक्त मिरवणुक महाराष्ट्रात इतिहास घडवेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मंडळानी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील  म्हणाले, डॉल्बीही आरोग्यास घातक असून डॉल्बीमुक्त गणपती विसर्जन मिरवणूक  काढून  कोल्हापुरची जनता महाराष्ट्रात इतिहास घडवेल. डॉल्बीला फाटा देवून पारंपारित वाद्याचा मनमुराद आनंद घेतल्याबद्दल समस्त कोल्हापुरकरांचे विशेषत: मंडळांचे आणि गणेश भक्तांचे त्यांनी आभार मानले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  गेल्या बारा दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात तसेच डॉल्बीमुक्त साजरा केला हिच परंपरा विसर्जन मिरवणुकीतही जोपासून डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीतून कोल्हापूर महाराष्ट्रात इतिहास घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गणेशमंडळांनी आणि नागरिकांनी गणेशोत्सव उत्सवात आणि शांततेत पार पाडून प्रशासनास केलेल्या सहकार्यबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्यावतीने कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गावरील अंबाबाई एक्सप्रेसचा केलेला देखावा मिरवणुकीतील आकर्षण असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामास गती आली असून या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आवश्यक निधी उपलब्ध झाला असून  येत्या एक दोन महिन्यात काम सुरु होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतल्याबदल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे तसेच शहर आणि जिल्ह्यातील सर्व मंडळांचे आभार मानले. 
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, तहसिलदार उत्तम दिघे, श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे उपाध्यक्ष संदिप चौगुले,  उत्सव कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, सचिव विकास पायमल, ॲड. धनजंय पठाडे, आर. के. पोवार, विजय देवणे, डॉ. उदय गायकवाड, दिलीप देसाई यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका विविध मंडळाचे पदाधिकारी, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.