इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

नवऊर्जा उत्सवातून जनतेस ऊर्जा मिळेल जिल्ह्यातील जनतेने लाभ घ्यावा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील





नवऊर्जा उत्सवाचा शानदार शुभारंभ: भाविक व पर्यटकांना धार्मिक व सांस्कृतिक पर्वणी

          कोल्हापूर दि. 21 :- नवऊर्जा उत्सवातून कोल्हापूरवासियांना निश्चितपणे सकारात्मक ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन या नवऊर्जा उत्सवास जिल्ह्यातील जनतेने भेट घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्राचे महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
            कै. भालचंद्र चिक्कोडे ग्रंथालयाच्यावतीने येथील निर्माण चौकामध्ये नऊ दिवसांसाठी आयोजित केलेल्या नवऊर्जा उत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर हसिना फरास, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई, सौ. अंजली चंद्रकांत पाटील, दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, संदिप देसाई यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
            नवऊर्जा उत्सवामध्ये अतिभव्य अशा एकाच छताखाली कोल्हापुरातील नवदुर्गासह एकूण 13 देवतांचे एकत्रित दर्शन नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या नवऊर्जा उत्सवाचे खास वैशिष्टे म्हणजे, श्री अंबाबाईचा मळवट भरलेल्या चेहऱ्याचे आकर्षक आणि भव्य प्रवेशव्दार, मोठमोठ्या हत्तींच्या मूर्ती, प्रवेशव्दारावर भव्य मंगलकलश, दीपमाळा आणि प्राचीन मंदिराच्या भव्य भिंत्ती हे आकर्षण आहे. नवऊर्जा उत्सवांतर्गत एकाच छताखाली कोल्हापुरच्या नवदुर्गासह त्र्यंबोली, कात्यायनी, तुळजाभवानी आणि श्री अंबाबाईचे अनोखे दर्शन होणार आहे. यापैकी पाच देवतांच्या मुर्तीचे दर्शन हायड्रोलिक तंत्राने केले जात आहे, हे सर्वांर्थाने खास आकर्षण आहे. याबरोबरच आदिशक्ती श्री अंबाबाईचे महात्म्य सांगणारे बॅले नृत्य आणि 32 हजार चौरस फुटांचा भव्य सेट तसेच मान्यवर सेलेब्रिटींच्या उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवास कोल्हापूर जिल्ह्यासह नजीकच्या जिल्हयातील जनतेने तसेच पर्यटकांनी भेट देऊन नवदुर्गा दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले..
            नवऊर्जा उत्सवानिमित्त उद्योग, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखणीय योगदान दिलेल्या 27 कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, दररोज तीन महिलांचा या उत्सवामध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून नवऊर्जा उत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदक विजेती नेमबाज पट्टू अनुष्का रविंद्र पाटील, स्वयंसिध्दा संस्थेच्या सौम्या तिरोडकर आणि प्रसिध्द उद्योजिका ग्यानी बठेजा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवऊर्जा उत्सवाची संकल्पना आणि मांडणी-उभारणी करणारे प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांचा सत्कारही पालकमंत्री चंद्रकांत पाटील हातातील घडयाळ तर सौ. अंजली पाटील यांनी गळयातील चेन देऊन केला. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन श्री. देसाई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
            प्रसिध्द कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले की, श्री अंबाबाई देवीची सेवा करण्याची संधी नवऊर्जा उत्सवानिमित्त मला मिळाली असून कोल्हापुरकरांनी दिलेली ही सेवीची संधी आणि भेट आयुष्यभर जतन करु.
            याप्रसंगी सुप्रसिध्द गायिका श्रावणी रविंद्र यांनी सरस्वती स्तवन गाऊन श्री अंबाबाईच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. तसेच टीव्हीवरील नावाजलेल्या काही मालिकामधील टायटल शाँग गाऊन प्रेक्षकाकडून दाद मिळविली. गायिका श्रावणी रविंद्र यांचा सत्कार सौ. अंजली चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
            प्रारंभी कै. भालचंद्र चिक्कोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिक्कोडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नवऊर्जा उत्सवाची संकल्पना विषद केली. या नवऊर्जा उत्सवाचा जिल्हयातील तसेच नजीकच्या जिल्हयातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या समारंभास माजी आमदार बजरंग देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, नगरसेवक सत्यजीत कदम, नगरसेवक किरण नकाते, आनंत खासबागदार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी न्युजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी केले.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.