इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २४ जून, २०१९

जिल्हा वार्षिक योजना 271 कोटी अर्थसंकल्पित तरतुदीपैकी 90 कोटी प्राप्त निधी 100 टक्के खर्च करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश



                    
कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 2019-20 साठी 271 कोटींची अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी 90 कोटी प्राप्त झाले आहेत. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 113 कोटी 41 लाखाची तरतूद असून त्यापैकी 37 कोटी 23 लाख, तर ओटीएसपीसाठी 1 कोटी 97 लाख 77 हजार तरतुदीपैकी 65 लाख 91 हजार प्राप्त झाले आहेत.  हा निधी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश   महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 
           जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार हसन मुश्रिफ,  जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.
           सन 2018-19 साठीचा जिल्हा वार्षिक योजनेतील अर्थसंकल्पित तरतूद मार्च 2019 अखेर 100 टक्के खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठीचा 76.35 टक्के तसेच ओटीएसपी साठीचा 58.65 टक्के खर्च झाल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यासाठी आलेला निधी वेळच्यावेळी खर्च झाला पाहिजे. त्यासाठी सर्व यंत्रणेने आवश्यक तो पाठपुरावा केला पाहिजे. दर पंधरा दिवसांनी खाते प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीस याबाबतचा आढावा घेण्यात येईल. प्रत्येक वाडी, वस्ती विजेशिवाय राहणार नाही असा संकल्प जसा केला आहे, त्याचप्रमाणे रस्ते आणि पाणी यांची सोय करण्यात येईल. धनगर वाड्यावर कोण-कोणते रस्ते तयार केले याची यादी तयार करावी. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा योजनेबाबतही यादी करुन त्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. कोल्हापुरात येत्या सहा महिन्यात प्रत्येक घरात पाईपलाईनने गॅस पोहचेल असे आश्वासने त्यांनी यावेळी दिले. 
उपलब्ध निधी 100 टक्के खर्च करा-पालकमंत्री
             जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्व साधारण योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी सन 2019-20 यासाठी जिल्ह्यास उपलब्ध झालेला निधी  त्या त्या योजनांवर  100 टक्के खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व कार्यान्वित यंत्रणांना दिले.
जिल्ह्यातील 19 क वर्ग यात्रा स्थळांना मान्यता-पालकमंत्री
             जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थ क्षेत्राच्या विकासावर अधिक भर दिला असून जिल्ह्यातील 28 क वर्ग यात्रा स्थळांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामध्ये भुदरगड तालुक्यातील हनबरवाडीमधील श्री विठ्ठलाई मंदिर, नाधवडे आणि शेणगावमधील श्री. ज्योतिर्लिंग मंदिर, वासनोलीमधील बाटममंदिर, पाचवडेमधील श्री त्रिपुरेश्वर मंदिर, मडूरमधील ज्योतिर्लिंग मंदिर, गडहिंग्लज तालुक्यातील हिटणीमधील श्री बसवेश्वर मंदिर, कौलगेमधील श्री कल्लेश्वर मंदिर, कडगावमधील श्री हनुमान मंदिर, करंबळीमधील श्री नारायण मंदिर, हातकणंगले तालुक्यातील हेरलेमधील श्री क्षेत्र सिद्धोबा देवालय, कोरोचीमधील श्री हनुमान मंदिर,
          करवीर तालुक्यातील निगवे दु. मधील श्री विठ्ठल मंदिर व श्री मारुती मंदिर, कागल तालुक्यातील करनूरमधील श्री मरीआई बिरदेव मंदिर, वाळवेमधील श्री हनुमान मंदिर, पिराचीवाडीमधील श्री महादेव मंदिर व श्री हनुमान मंदिर, चिमगावमधील श्री चिमकाईदेवी मंदिर, करंजीवनेमधील भावेश्वरी मंदिर, हळदीमधील श्री चौंडेश्वरी मंदिर, बाणगेमधील श्री अंबाबाई मंदिर, द. वडगावमधील नागनाथ मंदिर, पन्हाळा तालुक्यातील घरपण येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर, राधानगरी तालुक्यातील बुजवडेमधील श्री खुळोबा देवालय, आम.व्हरवडेमधील श्री अंबाबाई मंदिर, राशिवडे बु. मधील नागेश्वर देवालय, आजरा तालुक्यातील होन्याळीमधील भैरवनाथ मंदिर आणि आजरा नरपंचायतमधील श्री रवळनाथ मंदिर यांचा समावेश असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
             या बैठकीत कृषी, पाणीपुरवठा, ऊर्जा, रस्ते, आरोग्य आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.  प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि समितीचे सदस्य, सदस्या उपस्थित होते.
00000
                                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.