गुरुवार, १४ जुलै, २०१६




जलयुक्त शिवार अभियानातून
राज्यात 24 टी.एम.सी पाणीसाठा
                                  पालकमंत्री चंद्रकांत पाटील
गाळमुक्त कळंबा तलावातील पाण्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन

               कोल्हापूर, दि. 14 : जलयुक्त शिवार अभियानातून राज्यातील गावागावात पाण्याचे शाश्वत जलसाठे निर्माण करुन पाणी टंचाईवर मात करणे शक्य असल्याचे यंदाच्या जलयुक्त शिवार अभियानातून सिध्द होत आहे. शासन योजना आणि लोकसहभागातून राज्यातील 6500 गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानावर 1800 कोटी रुपये खर्च करुन केलेल्या कामामध्ये 24 टी.एम.सी पाणीसाठा झाला, ही जलयुक्त शिवार अभियानातून घडलेली क्रांती असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले.
              जलयुक्त शिवार अभियानातून गाळमुक्त झालेल्या ऐतिहासिक कळंबा तलावातील पाण्याचे पूजन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी कळंबा गावातील बापूसो साळुंखे सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अमल महाडिक, गोकूळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंतना मिलींद जिवणे, कार्यकारी अभियंता जयंत खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
               जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या अभियानास राज्यातील शेतकरी आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळाल्याने सुमारे 400 कोटी रुपयांचे काम केवळ लोकसहभागातून पूर्ण होऊ शकले. या कामावर शासनाने 1400 कोटी असे एकूण 1800 कोटी रुपये खर्च करुन 6500 गावामध्ये 24 टी.एम.सी. पाणीसाठा निर्माण केला. पण हे पाणी साठविण्यासाठी 14 हजार कोटी रुपये खर्चाचे धरण बांधायला हवे होते. याचा अर्थ लोकसहभागातून फार मोठी  जलक्रांती घडू शकते याचा विश्वास महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिला आहे.  
               पाणी अनमोल आहे. पाण्याचे महत्व ओळखून त्याची बचत करणे आवश्यक आहे. जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब आडविणे आणि मुरविणे हे काम लोकसहभागातून करणे प्रत्येकाचेच कर्तव्य बनले आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या पुढील काळातही जलयुक्त शिवार अभियान अधिक गतीमान केले जाईल. नजिकच्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त बनविण्याच्या शासनाच्या संकल्पास जनतेनेही सक्रीय मदत करावी, लोकसहभाग वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेले स्वच्छ भारत अभियान आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राबविलेले स्वच्छ महाराष्ट्र अभियान खऱ्या अर्थाने स्वच्छ महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरले आहे. जनतेने वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता करुन स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यात सक्रीय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
               जलयुक्त शिवार अभियान आणि लोकसहभागातून 1881 मध्ये बांधलेल्या ऐतिहासिक कळंबा तलावातील गाळ काढण्याची मोहिम शासनाने हाती घेतली आणि केवळ दोन अडीच महिन्यात सव्वातीन लाख घन मीटर गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध करुन देण्यात आला. यामुळे कळंबा तलावात यंदा 32 कोटी 50 लाख लिटर वाढीव पाणीसाठी निर्माण होवू शकला. यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकसहभाग खऱ्या अर्थान उपयुक्त ठरला असल्याचे गौरवोद्गारही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. कळंबा तलाव गाळमुक्त करण्यासाठी शासनाने 37 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला. मात्र लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने 2 कोटी 65 लाखाची काम लोकसहभागातून होवू शकले.  त्यामुळेच 32 कोटी 50 लाख लिटर वाढीव पाणीसाठा होवू शकला. याकामी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि गावकर, शेतकरी यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
               समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाबरोबरच लोकसहभाग महत्वाचा ठरत असून जनतेने समाजासाठी योगदान देण्याची भूमिका आणि कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, म्हणाले समाजासाठी चांगले काम करण्यात प्रत्यकानेच पुढाकार घ्यावा. कोल्हापूरच्या लौकिकात भर टाकणाऱ्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये रक्तसाठा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी आणि नागरिकांनी रक्तसाठा उपलब्ध करुन देण्यासाठी रक्तदान शिबिरे घ्यावीत. 
               आमदार अमल महाडिक म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून कळंबा तलावातील गाळ काढण्याची मोहिम शासनाने हाती घेतली. या मोहिमेत कळंबा गावकऱ्यांबरोबरच जिल्ह्यातील जनतेने विशेषत: शेतकऱ्यांनी दिलेला लोकसहभाग लाख मोलाचा आहे.यापुढील काळातही पाण्याचा काळजीपूर्वक वापर करुन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रत्येकानेच योगदान देणे गरजेचे आहे. कळंबा तलाव गाळमुक्त करण्यासाठी शासनाने विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले सहकार्य उल्लेखनीय आहे.
               पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलींद जिवणे यांनी कळंबा तलाव गाळमुक्त करण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियान आणि मिळालेल्या लोकसहभागाची सविस्तर माहिती दिली. उपसरपंच दिपक तिवळे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. समारंभास पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संग्राम पाटील, माजी सरपंच अजय सावेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
            

0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.