रविवार, ३ जुलै, २०१६


                                   
दमदार पाऊस :आपत्ती यंत्रणा सज्ज

गेल्या कित्तेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर गेल्या आठवडयापासून जिल्हयात पावसाला सुरुवात झाली आहे. आठवडाभरात जिल्हयात दमदार पाऊस पडू लागल्याने शेतक-यांच्या चेह-यावर मात्र समाधान दिसू लागले आहे. जिल्हयातील धरणप्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीची पातळीतही वाढ होऊ लागली असून राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. यापुढील काही दिवस दमदार पाऊस पडत राहील्यास जिल्हयातील धरणप्रकल्पात चांगली पाणीसाठा होईत, तसेच नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होईल. ही सर्व परिस्थिती डोळयासमोर ठेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे.

            संभाव्य पुरपरिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांचा सर्व समावेशक कृती आराखडा जिल्हा आपती व्यवस्थापनाने तयार करुन त्यानुसार सर्व यंत्रणांना सजग आणि सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी        डॉ. अमित सैनी यांनी  दिले आहेत. जिल्हयात पाऊस आणि अतिवष्टीमुळे पूरपरिस्थिती उदभवल्यास सर्वसाधारणपणे 129 गांवे पूरबाधित होतात, त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर अधिक सक्षम आणि सतर्क केलीे आहे. जिल्ह्यातील पुरबाधित अशा 129 गावांमध्ये  शिरोळ तालुक्यातील 38 हातकणंगले -20, करवीर-23, कागल-11, राधानगरी -11, गगनबावडा-7, पन्हाळा-12, शाहुवाडी-5, आणि भुदरगड तालुकयातील 3 गांवाचा समावेश आहे. या पूरबाधित गांवामध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने शोध बचाव पथके गठीत केली असून त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले आहे, या सर्व कामावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून सर्व यंत्रणामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या कामासही प्राधान्य दिले आहे.
             जिल्हयातून प्रामुख्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा या नद्या वाहतात, कृष्णा नदी जिल्हयाच्या ईशान्यपूर्व सिमेवरुन तर वारणा, पंचगंगा, दुधगंगा आणि हिरण्यकेशी या नद्या वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. वारणा नदी सांगली कोल्हापूर जिल्हयाच्या सिमेवरुन 120 कि.मी. वाहते, जिल्हयातील कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्या पंचगंगा नदीस मिळाल्या आहेत. पंचगंगा नदी नृसिंहवाडीजवळ, तर दुधगंगा नदी जिल्हा सिमेबाहेर थोडयाच अंतरावर कृष्णा नदीस मिळते. तिलारी ही एकच नदी पश्चिमवाहिनी आहे. जिल्हयात राधानगरी, तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी पाटगांव ही प्रमुख धरणे आहेत, जिल्ह्यातील संभाव्या पुरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यासही प्रशासनाने प्राधान्य दिले असून धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच धरणप्रकल्पातील पाणीसाठा, विसर्ग आणि त्यानुसार नद्यीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या सर्व गोष्टी नियोजनबध्द, शास्त्रसुध्द पध्दतीने करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच जिल्हयातील नद्यांना येणारे पाणी तसेच इशारा पाणी पातळी, धोका पातळी आणि विसर्गाची माहितीही वेळोवेळी घेण्याची यंत्रणा पाटबंधारे विभागाने तैनात केली आहे. याबरोबरच बेळगाव, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थितीत पाणी सोडण्याचे नियोजन समन्वयाने करण्यावरही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी भर दिला आहे. जिल्ह्यात पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवण्यात आली असून रोजच्या रोज पडणा-या पावसाची नोंद केली जात आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरनियंत्रणासाठी आवश्यक पूर्वतयारी करुन पूराचा धोका असणाऱ्या गावांबरोबरच तालुका आणि जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन गट कार्यान्वित करुन आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनाचे प्रशिक्षणही दिले आहे. गाव पातळीवरही शोध बचावपथके कार्यान्वित केली असून यामध्ये पोलीस, आरोग्य, महसूल विभागाबरोबरच गृहरक्षक, अग्निशमन, व्हाईट आर्मी आणि गावातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. पूराचा धोका असणा-या गावांमध्ये नियंत्रण कक्ष अहोरात्र सुरु केला आहे.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध केली असून, यामध्ये इन्फ्लेटेबल रबर बोटी 23, आऊट बोट मशिन 13, लाईफ जॅकेट 150, लाईफ रिंग 160 याबरोबरच 3 इन्फ्लेटेबल मोटर बोट, 3 फायबर रबर बोट तसेच 65 लाकडी प्रवासी नावा सुसज्य ठेवण्यात आल्या आहेत. तसेच दोरखंड, टॉर्च, आदि आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. आपत्तीला तोंड देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली साधनसामुग्री योग्य सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली आहे. संभाव्य पूराची परिस्थिती निर्माण    झाल्यास शासकीय यंत्रणेबरोबरच जिल्ह्यातील स्वयंसेवी, सेवाभावी संस्था, संघटना आणि मंडळांचे सहकार्य घेण्यात येणार असून, यासाठीच्या समन्वयासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात 1 जूनपासून 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून संभाव्य पूरपस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे. या प्राधिकरणाच्या नियंत्रण कक्षाचा 1077 हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 0231-2659232, 2652950, 2652953 तसेच पोलीस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी 100 तसेच 0231-2662333 असे दुरध्वनी क्रमांक आहेत. याशिवाय पाटबंधारे विभागाने सर्व धरण प्रकल्पावर तसेच जिल्हास्तरावरही आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.
            संभाव्य पुरपरिस्थितीत करावयाच्या उपयायोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये पूरबाधित गावात बचाव मदत कार्य गतिमान करण्याची तयारी, पूरग्रस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाची ठिकाणे तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन, औषधोपचार, वीज अशा सर्व व्यवस्था प्राधान्याने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूर आणि आतिवृष्टीमुळे काही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले आहे. संभाव्य पूरनियंत्रणाच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन अधिक सजगआणि सतर्क आहे.
                                         -       एस.आर. माने
-                     माहिती अधिकारी, कोल्हापूर.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.