शुक्रवार, १५ जुलै, २०१६



नियमन अडत संदर्भात
लवकरच सर्वसमावेशक निर्णय
                         -पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत
कोल्हापूर, दि. 15 : महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमान्वये करण्यात आलेल्या नियमन अडत संदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वसमावेशक संवाद आणि चर्चेद्वारे  योग्य तो निर्णय घेतला जाईल, तो पर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे बोलताना केले.
            कृषि उत्पन्न पणन अधिनियमान्वये फळे आणि भाजीपाल्याच्या नियमासंदर्भात अडतीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने व्यापारी, अडते व्यापारी तसेच खरेदीदार यांची बैठक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात कृषि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत होते. बैठकीस खासदार राजू शेट्टी, सभापती परशुराम खुडे, उप सभापती विलास साठे, संचालक भगवानराव काटे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, पणनचे उपसर व्यवस्थापक संपत गुंजाळ, सहाय्यक सर व्यवस्थापक सुभाष घुळे, माजी महापौर नंदकुमार वळंजु, सदानंद कोरगावकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी आणि सर्व संबंधित उपस्थित होते.
            नियमन आणि अडतीसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वांनी कार्यरत रहावे, असे आवाहन करुन कृषि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, नियमन आणि अडतीसंदर्भातील समस्या आणि प्रश्न चर्चा आणि संवादाद्वारे सोडविण्याची शासनाची भुमिका असून हमाल, मापाडी, व्यापारी, खरेदीदार, अडती आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधूनच सर्व समावेशक निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. शासनाने नेमलेल्या समितीचा 6 ऑगस्ट पर्यंत अहवाल येणार असून तो पर्यंत सर्वांनीशासनाच्या निर्णयास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पणन राज्यमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन व्यापाऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीतील सौदे पुर्ववत  सुरु करण्याची तयारी दर्शवली.
            यावेळी व्यापारी, खरेदीदार, अडती यांचे पदाधिकारी तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
0 0 0 0 0 0

कृषि राज्यमंत्र्यांकडून कृषि योजनांचा आढावा
            कोल्हापूर, दि.15 : जिल्ह्यातील कृषि विभागाच्या विविध योजना, पाऊस तसेच पिक परिस्थितीचा नुतन कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सर्किट हाऊस येथे कृषि विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
            शेती आणि शेतकरी याचे हित डोळ्यासमोर ठेऊन कृषि अधिकाऱ्यांनी काम करावे, अशी सूचना करुन कृषि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शेती उत्पादन वाढविण्याबरोबरच बाजार पेठांचा मागोवा घेऊन कृषि उत्पादन करण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यापर्यंत प्रगत कृषि तंत्रज्ञान पोहचवून कमी खर्चात, कमी पाण्यात अधिक शेती उत्पन्न कसे मिळवता येईल याची आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात कृषि अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            यावेळी कोल्हापूर विभागाचे कृषि सहसंचालक डॉ. एन.टी.शिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कृषि उपसंचालक सुरेश मगदुम तसेच कृषि विभागातील अन्य अधिकारी तसेच तंत्र अधिकारी उपस्थित होते.

 0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.