गुरुवार, १४ जुलै, २०१६






आपत्तीच्या काळातील कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक
स्थलांतरीत कुटुंबांची सर्वोतोपरी काळजी घ्या
     कोल्हापूर, दि. 14 :जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी पुरस्थितीच्या काळात अतिशय चांगले नियोजन केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र शासन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालते त्यामुळे आपत्ती ग्रस्तांना मदत करताना कोणतीही कसूर ठेवू नका, जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना, आपत्ती उद्भवल्या तात्काळ मदतीच्या उपाययोजना करा, स्थलांतरीत कुटुंबांची सर्वोतोपरी काळजी घ्या. अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
     जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरस्थितीचा नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट अलोककुमार, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उप जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थिती होती.
     गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी 1 जून पासून सरासरी 116 टक्के जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अद्यापही 66 बंधारे पाण्याखाली असून गगनबावडा-कोल्हापूर, रत्नागिरी-कोल्हापूर या दोन प्रमख मार्गांसह काही रस्ते बंद आहेत. या पार्श्वभुमीवर उद्भवलेल्या परिस्थीतीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या चांगल्या नियोजनाबद्दल प्रशासनाचे कौतुक करुन ऑगस्ट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात पाऊस होवू शकतो या त्यामुळे गेल्या चार दिवसांच्या अनुभावांच्या आधारे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.  यामध्ये जिल्हा परिषदेकडे 42 बोटी उपलब्ध आहेत पंरतू पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट्स उपलब्ध नाहीत यासाठी आवश्यक लाईफ जॅकेट्सची यादी अंदाजित खर्च यासह प्रस्ताव तात्काळ सादर करा. जिल्ह्यात विविध ठिकाणी 306 कुटुंबातील 1242 लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कुटुंबांची सर्वाेतपरी काळजी घ्या. त्यांना अन्न, शुध्द पाणी आणि आरोग्य सुविधा तत्परतेने पुरवा, असे आदेश देऊन पाटील यांनी पूरस्थितीनंतर रोगराई साथीचे रोग याचा  प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन लोकांनां प्रतिबंधात्मकऔषधे द्यावीत मार्गदर्शन करावे. जिल्हा परिषदेने पाणी शुध्द राहील याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.
     जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दोघांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना 4 लाख रुपयांची मदत तात्काळ देण्यात येईल असे सांगून मदत बचाव कार्याचा आढावा घेतला. एनडीआरएफ च्या पथकाला जिल्ह्यात 12 जुलै रोजी पाचारण करण्यात आले असून 40 जवान, 2 अधिकारी एक डेप्युटी कमांडंट 6 बोटींसह सज्ज असून शहरात जिल्ह्यात एनडीआरएफ या संस्थेची दोन पथके कार्यरत आहेत. जीवन ज्योती संस्था आणि व्हाईट आर्मी यांचे  जवानही कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या मदत बचाव कार्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. 
     प्रधानमंत्री पीक विमा योजना हीच शेतकऱ्यांची तारणहार असून या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करुन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्या. त्यासाठी स्वत: शेतकऱ्यांपर्यंत पोहचा, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील भूस्स्खलन यादी तयार करण्यात आली असून यामध्ये पन्हाळा, शाहूवाडी आणि गडहिंग्लज या तालुक्यांमधील प्रत्येकी 1 तर राधानगरी तालुक्यातील 9 आणि भुदरगड तालुक्यातील 8 गावांचा समावेश आहे. यामध्ये 5231 लोक राहत असून येत्या काळात धोका उद्भवल्यास हानी होऊ नये यासाठी या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार कारावा त्यासाठी स्वतंत्र  बैठक लावावी, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
     बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाले बुजवून त्याठिकाणी झालेल्या बांधकामांमुळे पाणी साचून राहते त्यामुळे पूररेषेच्या आत झालेल्या बांधकामांच्या चौकशीला गती देणार असल्याचे सांगून महसूल मंत्री म्हणून काम करताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या चांगल्या बाबींना पुढे घेऊन जाणार, असे सांगून राज्याचा महसूल वाढविणार पण त्याचवेळी सामान्य माणसालाही दिलासा देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
     या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजाराम बंधार येथे जाऊन पूरपस्थितीची पाहणी केली. यावेळी सोबत महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 00 0 0 0 0  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.