इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृती योजना




            कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी साठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृतीची योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.  
            भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृती योजना इयता 1 ली ते 10 वी  मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू राहील. शिष्यवृत्तीचे दर (प्रतीमाह 10 महिन्यांकरिता) अनिवासी  इयत्तांना 1 ली ते 10 वी 100  रुपये प्रमाणे निवासी इयत्तांना 3 री ते 10 वी  500 रुपये प्रमाणे तसेच तदर्थ अनुदान वार्षिक अनिवासी इयत्तांना 500 रुपये निवासी इयत्तांना 500 रुपये प्रमाणे  राहतील.
योजनेच्या अटी शर्ती - या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ शासनाच्या मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणा-या विदयार्थ्यांना अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्तीसाठी  विदयार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा वार्षिक 2 लाख 50 हजार रुपये इतकी राहील. विदयार्थी अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्तीचा लाभ बंद करण्यात येईल. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांने तो शिकत असलेल्या शाळेमार्फत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांस अन्य मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेची  अमंलबजावणी  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्फत करण्यात येईल. शिष्यवृत्तीची  रक्कम संबंधित विद्यार्थ्यांने शाळेत प्रवेश घेतलेल्या दिनांकापासून ते शाळा सोडल्याच्या दिनांकापर्यंत दिर्घ मुदतीची सुट्टी वगळता शैक्षणिक वर्षातील 10 महिन्यांसाठी लागू राहील. (ज्या  विद्यार्थ्यांनी शैक्षणिक  वर्षात उशिरा प्रवेश घेतला असेल किंवा शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी शाळा सोडली असेल असे विदयार्थी वगळता.) एकदा मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचे पुढील शैक्षणिक वर्षामध्ये नुतनीकरण करण्यात येईल. तथापि  मागील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची किमान 60 टक्के नियमित उपस्थिती असणे अनिवार्य राहील. शिष्यवृत्तीची मंजूर रक्कम विदयार्थ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर जमा करण्यात येईल.
 या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व शाळांनी विदयार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह लवकरात -लवकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर कार्यालयात जमा करावेत, असे आवाहनही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.