इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

मौजे लिंगनूर दुमाला ग्रामस्थांना नवीन वर्षाची भेट मंजूर भूखंडाची नोंद 15 दिवसात 7/12 वर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


49 मागासवर्गीयांचा समावेश; 29 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात
        कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : कागल तालुक्यातील मौजे लिंगनूर दुमाला येथील गायरान क्षेत्रातील 31 मार्च 1990 रोजीच्या आदेशाने मंजूर झालेल्या भूखंडाची नोंद 7/12 वर 15 जानेवारी पर्यंत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कागल तहसिलदारांना आज दिले. यामध्ये एकूण 200 भूखंड मंजूर झाले असून 164 लाभार्थ्यांपैकी 49 भूखंड मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आले आहेत. या आदेशामुळे 29 वर्ष 9 महिन्यांपासून असणारी प्रतीक्षा संपली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या निर्णयाने लिंगनूर दुमाला ग्रामस्थांना जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन वर्षाची भेट ठरली आहे.
       मौजे लिंगनूर दुमाला येथील गायरान गट क्रमांक 120 क्षेत्र हे. 7.93 आर मध्ये उप विभागीय अधिकारी करवीर यांच्याकडील क्र एल.क्यू.एन./वशी/87/1990, दि. 31 मार्च 1990 रोजीच्या आदेशाने एकूण 200 भूखंड मंजूर झाले. 50x30 चौ.फू. अशी लांबी व रुंदी आहे. त्यामधील 49 भूखंड मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आले आहे. उर्वरित भूखंड कब्जेहक्काची रक्कम भरुन घेवून मंजूर करण्यात आले आहेत.
          या भूखंड धारकांची नोंद 7/12 वर अद्याप झालेली नाही. 7/12 वर गायरान अशी नोंद दिसून येत आहे. या बाबत लिंगनूर तलाठी यांनी मंजूर भूखंडाची सनद प्राप्त करुन सादर केल्या. वाटप भूखंडावर धारकांनी बांधकामे केली आहेत. परंतु त्यांची नावे मूळ आदेशाप्रमाणे 7/12 वर दाखल झाली नाहीत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
          200 पैकी 164 भूखंडावर भूखंडधारकांनी कब्जेहक्काची रक्कम भरली असल्यास अशा सर्व कागल गावच्या हद्दीत भूखंड क्रमांक 1,2,3,19,20,21 व 37 आणि यापूर्वी शर्तभंग नियमित केलेले भूखंड क्रमांक 28,112,126 व 109 असे एकूण 12 भूखंड क्रमांक वगळून गावठाण वाढीमध्ये वाटप केलेल्या भूखंडधारकांनी कब्जे  हक्काची रक्कम अद्याप भरली नसल्यास मूळ कब्जेहक्काच्या रक्कमेवर वाटप दिनांकापासून आज अखेर प्राईम लॅंडींग रेट नुसार व्याजाची रक्कम आकारणी करावी, अशी कब्जेहक्काची रक्कम व्याजासहीत वसूल केल्यानंतर भूखंडधारकांची नावे 7/12 वर कब्जेदार नोंद फेरफार नोंदीच्या आधारे करण्याची कार्यवाही करावी.
          मोजणी वेळी क्रमांक 1,2,3,19,20,21 व 37 कागल हद्दीमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. या भूखंडधारकांना शिल्लक भूखंडामधून वाटप न झालेले भूखंड वाटप करण्यात यावेत. मात्र या भूखंडधारकांनी कब्जे हक्काची रक्कम भरली नसल्यास मूळ कब्जेहक्काच्या रक्कमेवर प्राईम लँडींग रेट नुसार व्याजाची रक्कम आकारणी करावी आणि अशी कब्जेहक्काची रक्कम व्याजासहीत वसूल केल्यानंतर भूखंडधारकांची नावे 7/12 वर नोंद करण्याची नियमानुसार कार्यवाही करावी.
          गावठाण वाढीचा मंजूर रेखांकंन व उप अधीक्षक भूमी अभिलेख कागल यांच्याकडील मोजणी नकाशाप्रमाणे क.जा.प. तयार झाल्यानंतर भूखंड निहाय स्वतंत्र 7/12 उतारा तयार करुन सर्व भूखंडधारकांचे स्वतंत्र 7/12 उतारे करण्यात यावेत. ही प्रक्रिया 15 जानेवारी 2020 पूर्वी पूर्ण करुन तसा अहवाल देण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
          अशा प्रकारे हक्कापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील भूखंडधारकांची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत. 
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.