इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

आपल्या हक्कांसाठी ग्राहकांचा दबाव निर्माण व्हायला हवा -जिल्हाधिकारी दौलत देसाई







कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) :  ग्राहकांना गृहीत धरून वस्तू त्यांच्या माथी मारल्या जातात. आपल्या हितासाठी, हक्कासाठी ग्राहकांचा दबाव निर्माण व्हायला हवा. त्यासाठी जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
       राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडप येथील विविध विभागांच्या जनजागृती केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अरूण यादव उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, ग्राहक दिन हा प्रदर्शनापुरताच मर्यादित राहू नये. ग्राहकांच्या हिताबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी तरच अन्न भेसळ थांबू शकेल. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घरातून पदार्थ आणायला सांगायचे. या पदार्थांची चाचणी करायची. अशा पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी हे पदार्थ ज्या दुकानदाराकडून आणले आहेत त्याच्यासमोर निदर्शने करायचे. केवळ एवढ जरी केलं तरी या चळवळीचा उद्देश सफल होईल. नमुना दाखल जिल्ह्यातील एक-दोन शाळांमध्ये याची सुरूवात व्हावी, असे निर्देश त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले.
          महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यावेळी म्हणाले, ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकारांची आणि हक्कांची जाणीव जागृती व्हायला हवी, त्यासाठी जनजागृतीबरोबरच मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिकेही झाली पाहिजेत. श्रीमती सविता भोसले यावेळी म्हणाल्या, विक्रेत्यांच्यासमोर ग्राहकांची निदर्शने झाल्यास त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. जिल्हा ग्राहक न्यायालय 99 टक्के निर्णय हे ग्राहकांच्या बाजूने होतात. ग्राहकांनी स्वत: जागृत झालं पाहिजे.
          श्री. यादव यावेळी म्हणाले, ग्राहक संरक्षण कायदा होवून 34 वर्षे झाली. ग्राहक संघटित न झाल्यामुळे आजूनही तो जागृत झाला नाही. मी फसणार नाही आणि फसवणारही नाही अशी शपथ आजच्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपण घेवू. भेसळयुक्त माल विकला जाणार नाही. याबाबत आपण सर्वांनी जागृत राहू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          अन्न  व औषध प्रशासन, सहाय्यक नियंत्रक वैद्यमापन शास्त्र, भारत गॅस, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, प्रादेशिक परिवहन मंडळ, भारतीय पोस्ट, भारत संचार निगम लि. आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या स्टॉलचे यावेळी उपस्थितांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसिलदार शीतल भामरे -मुळे, अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे-जाधव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील आदींसह विविध विभागांचे अधिकारी, ग्राहक पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

इंडियन सराईज ॲक्टनुसार सार्वजनिक संस्थांमधील
स्वच्छतागृहे नागरिकांसाठी -अरूण यादव
इंडियन सराईज ॲक्टनुसार सर्व हॉस्पिटल, हॉटेल अशा सार्वजनिक संस्थांमधील स्वच्छतागृहे, शौचालयांची सुविधा प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, असे सांगून अरूण यादव म्हणाले, या तरतुदीचा जिल्ह्यामध्ये सर्वत्र लाभ देण्यासाठी महापालिका आयुक्त तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी बंधनकारक करावे.


00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.