इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

संत वाङ् मयाच्या सहायाने शिक्षणाचा पाया मजबूत करु -उद्योग खनीकर्म मंत्री सुभाष देसाई






      कोल्हापूर, दि. 28 (जि.मा.का.) : मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. शालेय शिक्षणातील मुल्य शिक्षणात संत वाङ् मयाचा समावेश करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. संत वाङ् मयाच्या सहायाने शिक्षणाचा पाया मजबूत करु, अशी ग्वाही उद्योग, खनीकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 
            वारकरी साहित्य परिषदेच्या 8 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योगमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, वीणा पूजन आणि साहित्य पूजनाने आज करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. अमृतमहाराज जोशी, श्रीमद शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी पाटील, महापौर सूरमंजिरी लाटकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
            उद्योगमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, हे वारकरी  साहित्य संमेलन राज्याला मार्गदर्शन करेल. संतांच्या परंपरेत जात, धर्म, वर्ण, लहान, मोठा असा भेदभाव न करता ज्यांनी पांडुरंगाचा जयजयकार केला, त्याला महाराष्ट्राने मस्तकी धरला आहे. समाजातील विषमतेवर संतांनी आपल्या कीर्तनातून, भजनातून आघात केला. महाराष्ट्राने साहित्याच्या अभ्यासकांनाही सन्मान दिला आहे, त्यांना मुजरा केला आहे.  महाराष्ट्र शासन ज्ञानोबा, तुकाराम यांच्या नावाने पुरस्कार देवून नेहमीच सन्मानित करते. वृध्द कलाकारांना मानधन देण्याची तरतूद हा एक कीर्तनकार, भजनकार यांचा सन्मान आहे. 
            जीवन भरकटत असताना संतांचे विचारच मानवांना मार्गावर ठेवतात, असे सांगून उद्योगमंत्री पुढे म्हणाले, मराठी भाषा ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. राज्यातील प्रत्येकाला ही भाषा आलीच पाहिजे. मराठीचा सन्मान कदापीही कमी होवू देणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तात्काळ मिळावा, अशी मागणी प्रधानमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे, ती निश्चित मान्य होईल, असा विश्वास आहे. संतांच्या वाङ् मयाचा  आपल्या शिक्षणाला स्पर्श व्हावा. यासाठी त्याचा समावेश शालेय शिक्षणातील मुल्य शिक्षणात झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. 
            अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. अमृतमहाराज म्हणाले, वारकऱ्यांनी कीर्तनातून आणि भजनातून क्रांतीचे विचार विज्ञान युगापर्यंत पोहचविले. शेख महंमद आणि माणकोजी महाराजांचे वाङ् मय संशोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत यायला हवं  ज्ञानदेव आणि तुकारामांचं नाव घेतलं की, जगातील सगळ्या संतांचं नाव त्यात आलं. जीवनातील विकासात्मक प्रकल्पांचं विषय संत साहित्यामध्ये दिलं आहे.  येणाऱ्या काळात परिवर्तनवादी व्हायला हवं. वर्तमानकाळ वाचक जीवन जगण महत्वाचं आहे, असेही ते म्हणाले. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. ह.भ.प. निवृत्तीमहाराज  नामदास, ह.भ.प. प्रभाकर बोधलेमहाराज, ह.भ.प. भानुदासमहाराज आणि ह.भ.प. उषाताई कांबळे यांना विशेष विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमद शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनीही यावेळी आशीर्वचन दिले. 
            पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव यांनी स्वागत तर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटन सत्राचं आभार ह.भ.प. यादव महाराज यांनी आभार मानले.  कीर्तनकार उषाताई कांबळे यांनी म्हटलेल्या पसायदानानंतर सत्राची सांगता झाली.
0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.