इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

बेटी बचाओ बेटी पढाओ ही चळवळ लोकसहभागातून यशस्वी करा -शौमिका महाडीक सामाजिक जबाबदारीतून आणि कर्तव्यातून काम करावे- जिल्हाधिकारी







कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' लोकसहभागातून यशस्वी करा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडीक यांनी तसेच केवळ शासकीय काम म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारातून आणि कर्तव्यातून सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
       जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ आणि बेटी बढाओ या योजनेचा लोगो असणाऱ्या बाहुलीचे लोकार्पण आणि कार्यशाळेचे उद्घाटन  आज जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महिला व बाल विकास सभापती वंदना मगदूम, आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसुळ, भुयेच्या माजी सरपंच राणी पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील आदी उपस्थित होते.
          महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी यावेळी स्वागत, प्रस्ताविक करून जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबत संगणकीय सादरीकरण केले. श्रीमती महाडीक पुढे म्हणाल्या, देवी लक्ष्मीकडे अर्थ, सरस्वतीकडे विद्या आणि देवी दुर्गेकडे संरक्षण अशी महिलांकडे महत्वाची खाती आहेत. बेटी बचाओ ही लोकचळवळ बनली पाहीजे. ती प्रभावीपणे जिल्ह्यामध्ये राबवावी. महिलांना संरक्षण देण्याची जबाबदारी केवळ पोलीसांची नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मावळ्यांची आहे. ती खात्री तिला द्या, असे आवाहन त्यांनी केले.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, आपला जिल्हा प्रत्येक क्षेत्रता आघाडीवर असताना मुलींच्या जन्मदर प्रमाणामध्ये पाठीमागे आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे.  मुलगी म्हणजे नकुसा ही भावना बदलायला हवी. कायद्याचा धाक आणि सामाजिक जाणिव यामधून मुलींचे स्वागत व्हायला हवे त्यासाठी कृती कार्यक्रम करा.
          एका मुलीवर किंवा दोन मुलींवर कुटुंब नियेाजन करणाऱ्या कुटुंबाला ताराराणी प्राधान्य कार्ड जिल्ह्यात देण्यात येणार आहे. या कार्डधारकाला कोठेही रांगेत उभे रहावे लागणार नाही. सन्मानाने कार्डधारकाचे स्वागत करून प्राधान्याने त्याला प्रवेश मिळणार आहे. ही योजना राज्यात नव्हे तर देशात प्रथमच आपल्या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
          त्याचबरोबर शासकीय तसेच खासगी शाळा प्रवेशांमध्येही प्रवेश देण्यासाठीही शिक्षण संस्थांना विश्वासात घेवून अशा मुलींना प्रवेश देण्यासाठी कोटा निश्चित केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
          महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी, महिला व बाल विकास समितीच्या सभापती श्रीमती मगदूम आणि राणी पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.  या कार्यशाळेला गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.