-
कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा
वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन करण्याची सर्वांनी मांडलेली भूमिका लक्षात घेवून
सोमवारपासून सात दिवस जिल्ह्यात 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. केवळ दूध पुरवठा आणि औषधांची दुकाने सुरु राहणार आहेत. संक्रमणाची साखळी
तोडण्यासाठी नागरिकांनी या लॉकडाऊनला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज
पाटील यांनी केले.
पालकमंत्री श्री.
पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र
पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष,
नगराध्यक्ष, जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ आज बैठक घेतली.
या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील,
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ
गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
सुरूवातीला
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या
सद्यस्थितीची माहिती दिली. यामध्ये खाटांची उपलब्धता, दुसऱ्या टप्प्यातील कोवीड
काळजी केंद्रांचे नियोजन, प्लाझ्मा थेरेपी, लॅबमधील तपासणी यांचा समावेश होता. ते
म्हणाले, कोरोनाबाबत पहिली बैठक 12 मार्चला घेतली आणि ग्रामसमिती, प्रभागसमिती
स्थापन करण्याबाबत सूचना केली. या
समित्यांनी अतिशय चांगलं काम केल आहे. सद्या 19 कोवीड काळजी केंद्र कार्यरत असून या
आठवड्यात आणखी 19 कार्यरत होतील. तपासणी नाक्यांवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्त्तीचे
संगणकीय यंत्रणेच्या माध्यमातून नोंद घेवून 7 निश्चित केलेल्या पॅरामिटरवर त्याची
तपासणी करण्यात येते. याबाबतची माहिती जिल्हा स्तरावरील वॉररूममधून कळते. प्लाझ्मा
थेरेपीवर सुरूवातीपासून भर दिला जात आहे. खासगी वैद्यकीय डॉक्टर्स तीन शिफ्टमध्ये
काम करत आहेत. मृत्यू होणार नाही यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे.
मास्क हे कोरोनासाठी एके-47- ग्रामविकासमंत्री
ग्रामविकासमंत्री
श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले, लक्षणे दिसल्यावरही लोक अजूनही वेळेवर सांगत नाहीत.
ते घरीच थांबत आहेत. त्यामुळे मृत्यू दरही वाढत आहे. शिवाय आपल्या कुटूंबाला ते
धोक्यात आणत आहेत. याबाबत प्रसार करावा. कोरोनाशी लढण्यासाठी मास्कचा सक्तीने वापर
व्हायला हवा. त्यासाठी दंडात्मक, कायदेशीर कारवाई करा. कोरोनाविरूध्द लढण्यासाठी
मास्क सद्या एके -47 आहे. सर्वांच्या येणाऱ्या मतानंतर लॉकडाऊनबाबत चर्चा करून
निर्णय घेतला जाईल.
खासदार
धैर्यशील माने यावेळी म्हणाले, आपल्या जिल्ह्यात आपल्या नियंत्रणाखाली उत्तम
काम करत होते. आयसीएमआरच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी कमी करण्यात आली. लॉकडाऊन
हा एकमेव उपाय असेल तर त्याबाबत निर्णय घ्यावा.
आमदार पी.एन.पाटील म्हणाले, लॉकडाऊन
करण्यात यावा. तो करण्यापूर्वी दोन दिवस आधी त्याबाबत पूर्वसूचना देण्यात यावी.
त्यामुळे नागरिक आवश्यक गोष्टिंची खरेदी करुन नियोजन करतील.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, इचलकरंजीला
लॉकडाऊन करण्यात आले पण, लॉकडाऊन उठल्यावर मोठ्या संख्येने रूग्णसंख्या वाढली. ही
संख्या वाढण्याचे कारण तपासावे लागेल. लॉकडाऊन करण्यापेक्षा लोकजागृतीवर भर
द्यावा. रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट उपलब्ध करून द्या. त्याचबरोबर आयजीएममध्ये मनुष्यबळ
कमी पडत आहे. नगरपालिकेने सेवामुक्त केलेले 42 आरोग्य कर्मचाऱ्यांना घेण्यात यावे.
प्रतिबंध झोन 100 मीटरचा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आमदार चद्रकांत जाधव म्हणाले, मृत
व्यक्तीचा अहवाल आल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देवू नये. प्रभाग
सचिवांनी गर्दी कमी ठेवण्याबाबत तसेच सामाजिक अंतर ठेवण्याबाबतही मृत व्यक्तीच्या
नातेवाईकांचे प्रबोधन करावे. लग्न सोहळ्यासाठी नियमांचे काटेकोर पालन व्हावे.
लॉकडाऊन करताना उद्योगासाठी कर्मचाऱ्यांना पासेस द्यावेत, असेही ते म्हणाले.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, क्वॉरंटाईनसाठी
घेतलेल्या शाळांमध्ये बाथरूमची योग्य सुविधा नसल्याने होमक्वॉरंटाईन करायला
परवानगी द्यावी. रूग्णसंख्या पाहून त्याठिकाणी लॉकडाऊन करा.
आमदर ऋतुराज पाटील म्हणाले, व्हेंटिलेटरची सद्या
गरज आहे. त्याबाबत सेंट्रली सोय करावी. 10 दिवस लॉकडाऊन केल्यास साखळी तोडता येईल.
त्याबाबत नियोजन करावे.
आमदार राजेश पाटील म्हणाले, ग्रामीण भागात
आरोग्य सेवेतील रिक्त मनुष्यबळ भरून काढावं. परिसर सीलबंद करण्याचा कालावधी 28
दिवसावरून कमी करण्यात यावा. 15 दिवस लॉकडाऊन करावा.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठवलेला
संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी वाचून दाखविला. या संदेशात म्हंटले आहे, पूर्वनियोजित
रायगड दौऱ्यामुळे मी बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. जबाबदार नागरिक म्हणून काही
सूचना व निरीक्षण मांडत आहे. प्रत्येकाने मला कोरोना झाला आहे व समोरच्यालाही
कोरोना झाला आहे हे समजून सर्वांनी वागले पाहिजे. प्रत्येकाने मनात म्हटले पाहिजे
तुम्ही आम्हाला कोरोना देवू नका आणि आमच्याकडून कोरोना घेवून जावू नका. औषधापेक्षा
आपली जीवनशैली बदलायला हवी. संपूर्ण लॉकडाऊनमुळे कोरोना थांबत नाही. एकप्रकारे तो
तात्पुरता पॉझ आहे. प्रत्येक घटकाने आपापल्या परिने जागृत राहून जनजागृती करणे
आवश्यक आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील म्हणाले, वाढणारा संसर्ग
तोडण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा.
इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी
म्हणाल्या, इचलकरंजीमध्ये समुह संसर्गाचा मोठा धोका झाल्यामुळे घबराटीचे वातावरण आहे.
स्वतंत्र टास्क फोर्स मिळावा. त्याचबरोबर इचलकरंजीसाठी स्वतंत्र बैठक लावावी.
महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या, लॉकडाऊन हा 100
टक्के उपाय असेल तर तो केलाच पाहिजे. नागरिकांच्या सवयी बदलणे गरजेचे आहे.लक्षणे
आढळल्यास नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आमदार राजू आवळे म्हणाले, ग्रामीण भागात
आवश्यकतेनुसार गावागावात लॉकडाऊनचे निर्णय घेवून ते नियंत्रण ठेवत आहेत.
गडहिंग्लजच्या नगराध्यक्ष स्वाती कोरी
म्हणाल्या, कंटेन्टमेंट झोनच्या 28दिवसांमुळे व्यापाऱ्यांची अडचण होत आहे. तो कालावधी
कमी करावा. ज्या ठिकाणी कोवीडचा प्रभाव आहे त्या ठिकाणी लॉकडाऊन करावा. संपूर्ण
जिल्ह्यात नको. कंटेन्टमेंटमुळे मुख्य प्रमुख रस्ता बंद करण्यात येवू नये.
राष्ट्रवादीचे
आर.के. पोवार, शिवसेनेचे विजय देवणे, मुरलीधर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालंदर
पाटील, जनार्दन पाटील, भाजपाचे अशोक देसाई, आरपीआयचे (आठवले गट) उत्तम कांबळे,
आरपीआय (गवई गट) विश्वास देशमुख, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, आरपीआय (कवाडे गट)
डी.जी. भास्कर, वंचित बहुजन आघाडी विलास कांबळे, ब्लॅक पँथर सुभाष देसाई, शेकापचे
बाबुराव कदम, डीपीआयचे शिवाजी आवळे, मनसेचे प्रसाद पाटील, माकपचे ए.बी. पाटील
आदींनीही आपल्या सूचना यावेळी मांडल्या.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यावेळी म्हणाले,
प्रशासन अतिशय चांगलं काम करत आहे. विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी चांगल्या
सूचना केल्या आहेत. लॉकडाऊन करायचा की नाही यावर चर्चा करावी लागेल. उद्योजकालाही
अडचणी येणार नाहीत याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मृत्यू दर कमी करण्यासाठी
तसेच नियंत्रणाबाबत उपाययोजनांवर अधिक भर
दिला जाईल.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रत्येक
लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष प्रमुखांच्या सूचनांना तात्काळ प्रतिसाद दिला. ते
म्हणाले, इचलकरंजीमध्ये रॅपीड ॲन्टीजेन टेस्टला कालपासून सुरूवात झाली आहे. 42
आरोग्य कर्मचाऱ्यांना सद्या तात्पुरत्या करार पध्दतीने घेण्यात येईल. गृह
अलगीकरणासाठी परवानगी देण्यात आली असून त्याबाबत ग्रामसमितीला सूचना देण्यात आली
आहे. ज्यांनी व्हेंटीलेटर्स देण्याविषयी सांगितले होते त्या उद्योजकांशी चर्चा
करून विषय मार्गी लावावा. कंन्टेन्टमेंटचा विषय त्याचा कालावधी कमी करून मार्गी
लावला जाईल. एक दिवसाच्या पाससाठी किती संख्या आहे ते पाहून त्याबाबतच्या
नियमावलीचा निर्णय घेतला जाईल. संजय घोडावत विद्यापीठामधील अतिरिक्त 3 वसतिगृह
घेण्यात आले आहेत. त्यामध्ये खाटांची संख्या वाढवण्यात येईल.
दक्षता म्हणून परिसर
सीलबंद करण्याचा निर्णय घेतला जात असला तरी त्याच्या कालावधीबाबत आणि मुख्य
रस्त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, गेले दोन-तीन
महिने शासनाच्या सूचनांचे पालन करून आपण सर्वांनी लॉकडाऊन पाळला आहे. सद्या
वाढलेल्या रूग्णसंख्यांबाबत काहीजणांनी फोन करून धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत
सूचना केल्या. त्यासाठी आज ही बैठक घेण्यात आली. नागरिकांमध्ये आत्मविश्वास
निर्माण करायला लागेल. अजूनही लक्षणे दिसल्यावर अंगावरच काढणारा मोठा वर्ग आहे. तो
शेवटच्या क्षणी उपचारासाठी येतो. यासाठी आपण सर्वांनी प्रबोधन करू त्याचबरोबर
शहरात काही ठिकाणी स्वॅब घेण्याची सुविधा करता येईल का याबाबतही निर्णय घेवू.
लक्षणे दिसताच उपचारासाठी पुढे यावे-
पालकमंत्री
सोमवारपासून
जिल्ह्यात सात दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. ते
म्हणाले, आजअखेर जवळपास 40 हजार तपासण्या करण्यात आल्या आहेत. 853 ॲक्टीव केसेस
जिल्ह्यात असून आज एका दिवसात 203 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 1753 बेडची
व्यवस्था करण्यात आली असून खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिडसाठी बेड देण्याची भूमिका
घेतली आहे. जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी आणि राजकीय
पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. वाढत चाललेली रुग्ण संख्या आणि मांडलेली भूमिका
लक्षात घेवून सोमवारपासून जिल्ह्यात सात दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
दूध पुरवठा आणि
औषधांची दुकाने सुरु राहणार आहेत. याबाबत विस्तृत मार्गदर्शिका उद्या शनिवारी
जाहीर करण्यात येईल. या सात दिवसांसाठी खरेदी आणि नियोजन करण्यासाठी उद्या शनिवार
आणि रविवार हे दोन दिवस मिळतात. नागरिकांनी आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास
तात्काळ उपचारासाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. अजिबात वेळ घालवू नये, असे
आवाहन करुन पालकमंत्री म्हणाले, मृत्यू झालेल्या 30 रुग्णांमध्ये अतिजोखिमची
व्याधी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 50 वर्षापुढील अशा व्याधीग्रस्त
व्यक्तींनी दक्षता घ्यावी. लक्षणे दिसल्यास स्वॅबसाठी पुढे यावे तरच कोरोना धोका
पुढे जाणार नाही.
संक्रमणाची साखळी रोखण्यासाठी अपरिहार्यतेने
लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.