कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): खासगी
रूग्णालयांमध्ये शासनाच्या निर्णयानुसार बेड आरक्षित ठेवून निर्देशानुसार आकारणी
करून उपचार करा, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा मागणीनुसार करू असे
आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
शहरातील खासगी रूग्णालयांच्या
डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे काल संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आपत्ती व्यवस्थापन
समिती प्राधिकरण समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते. तसेच आमदार चंद्रकांत जाधव व्ही.सी.द्वारे
सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री.
देसाई यावेळी म्हणाले, एखादे मोठे रूग्णालय कोव्हिड रूग्णालय करता येईल का , याठिकाणी
सर्व डॉक्टर्स येवून उपचार करता येतील, यामुळे रूग्णांची सोय होईल. उपचारासाठी रूग्णांना
फिरायला लागणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने योग्य नाही. सी.पी.आर. मध्ये खाटांची क्षमता
वाढविण्यात येत आहेत. सध्याची वेळ वेगळी आहे. ती लक्षात घेवून सर्व रूग्णालयांनी शासनाच्या
निर्देशानुसार बेड आरक्षित ठेवून रूग्णांवर उपचार करावेत, त्यासाठी शासनाने दिलेल्या
मार्गदर्शनानुसार बिलांची आकारणी करावी.
महापालिका
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, खासगी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णांला तात्काळ
दाखल करून त्याच्यावर डॉक्टरने उपचार करणं हे अत्यंत महत्वाचे आहे. ही वेळ
सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या काम करण्याची आहे. रूग्णांवर उपचार होणार नसतील तर
हे जिल्ह्याच्या दृष्टीने हे चांगले नाही. तुमच्या सोबत प्रशासन आहे. अनेक रूग्णालयांनी
घरी आरोग्य सुविधा चालू केली आहे. यासोबतच हॉटेल मध्येही रूग्णसेवा देत आहेत. तक्रारी
येवू नयेत यासाठी नियोजन आवश्यक आहे.
दर आकारणीचे फलक लावावेत
खासगी रूग्णालयांसाठी
शासनाने दर आकारणीबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार रूग्णांवरील उपचाराची दर
आकारणी व्हावी. शासनाने घालून दिलेल्या दर आकारणीबाबत रूग्णालयात फलक लावावेत, अशी
सूचना डॉ. कलशेट्टी यांनी यावेळी केली.
प्रत्येकाने आपले योगदान देऊन आशीर्वाद घ्यावेत
– आमदार चंद्रकांत जाधव
रूग्ण सेवा ही श्रेष्ठ
सेवा आहे. प्रत्येक रूग्णालयांनी त्यामध्ये योगदान द्यावे, त्यांना बाहेर घालवू
नका, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. आपल्याच माणसांना आपण मदत करायला हवी. मानवतेच्या
दृष्टीकोनातून मदत करायला हवी. त्याचबरोबर शासनाने ठरवलेल्या दराचा फलक
रूग्णालयांत लावावा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.
सिध्दीविनायक
रूग्णालयाचे डॉ. संजय देसाई, ॲस्टर आधारचे डॉ. दामले आणि डॉ. केणी, डायमंडचे डॉ.
साईप्रसाद, स्वस्तिकचे डॉ. अर्जुन अडनाईक, अथायूचे डॉ. सतीश पुराणिक, डॉ. दिपक
जोशी, ॲपलच्या गीता आवटे आदींनी सहभाग घेवून सविस्तर माहिती दिली.
सोबत – फोटो जोडला आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.