कोल्हापूर,दि. 15 (जिल्हा
माहिती कार्यालय) : संस्थात्मक अलगीकरणासाठी शहरातील 30 हॉटेल कार्यरत आहेत. या
ठिकाणी केसपेपर व तत्सम रेकॉर्ड याची स्वतंत्र नोंद केली जाते. अतिजोखमीच्या
व्यक्तींसाठी स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला तरी 5 दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाते, अशी
माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
संस्थात्मक अलगीकरणाच्या कार्यपध्दतीबाबत
त्यांनी माहिती दिली. सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालय, आयसोलेशन रूग्णालय येथील
तपासणी केंद्र या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी असणाऱ्या हॉटेलची यादी,
त्यांचा पत्ता व भाडे याबाबत माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तपासणी केंद्रातून
अलगीकरणासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्ती यादीमधील हॉटेलची स्वत: निवड करतील. हॉटेलची
पावती घेवून बुकींगची खात्री झाल्यानंतर तपासणी केंद्रात हॉटेलचे नाव नोंद केले
जाते.
तपासणी केंद्रातील संदेशानंतर संबंधिताची माहिती हॉटेलला
ग्रुपवर कळवून संबंधित व्यक्ती आल्याची खातरजमा केली जाते. रेड झोनमधून आलेल्या
व्यक्तीचा स्वॅब घेतल्यास त्याला स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व
सचिव यांच्या मान्यतेनंतर गृह अलगीकरणासाठी सोडले जाते. पॉझीटिव्ह अहवाल आल्यास
त्याला तात्काळ सीपीआरला हलविले जाते. पॉझीटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या
हायरिस्क व्यक्तीला दुसऱ्या खोलीत अलगीकरण केले जाते. पुन्हा 5 दिवसांनी स्वॅब
तपासणी केली जाते.
शासकीय केंद्रामध्ये अलगीकरण करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना
परवानगी दिली जाते. हॉटेलमधील व्यक्तींची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन तपासणी
केली जाते.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.