इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

वाहनांची अचानक तपासणीचे जिल्हाधिकारी देशमुख यांचे आदेश घरगुती गॅस सिलेंडरचा वापर टाळण्यासाठी भरारी पथके

      कोल्हापूर दि. १५ : घरगुती गॅस सिलेंडरचा वाहनांमध्ये अनाधिकृतपणे वापर करणार्‍या सर्व वाहनांची अचानक तपासणी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज दिले.
      जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गॅस वितरक, गॅस कंपनीचे अधिकारी, ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांचे निरीक्षक यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
      तपासणीकामी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये पाच पथकांची नियुक्ती करण्यात येणार असून पथक प्रमुख म्हणून तहसिलदार, नायब तहसिलदार यांची नियुक्ती करुन पथक सदस्य म्हणून पुरवठा निरीक्षक, पोलीस निरीक्षक, गॅस कंपनीचे अधिकारी व आर. टी. ओ. निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
      वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा होणार वापर टाळण्यासाठी वाहन रजिस्टर करतेवेळी देण्यातयेणार्‍या आर. सी. बुकमध्ये प्राधिकृत अ‍ॅटो गॅस पंपाद्वारे किती गॅस वाहनांमध्ये भरलेला आहे व किती पेट्रोल वापरले आहे याची नोंद करणे आवश्यक राहील असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, हॉटेल, खानावळी यांनीही व्यावसायिक गॅस सिलेंडर घेणे बंधनकारक राहील. हॉटेलचा परवाना नुतनीकरण करतेवेळी हॉटेलने व्यावसायिक सिलेंडरच्या पुस्तकाची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. वाहनांमध्ये अनाधिकृत गॅस किट तयार करण्यावर निर्बंध यावेत म्हणून गॅस कंपनीकडून पूर्वी ५ किलो वजनाची वितरित केलेली लहान गॅस सिलेंडर ग्राहकांनी ज्या त्या गॅस एजन्सीकडे परत करण्याची आहेत.
      मार्च २०१२ पासून शंभर टक्के घरपोच गॅस सिलेंडर देणे वितरकांवर बंधनकारक राहील असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, एक गॅस सिलेंडर तसेच दोन गॅस सिलेंडरधारकांना घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येईल. रेशनकार्ड नसणार्‍या गॅसधारकांस १ मार्च २०१२ पासून गॅस सिलेंडर वितरित करता येणार नाही. त्याप्रमाणे एकाच कुटुंबातील सदस्य विभक्त राहत असल्यास त्याचा खात्रीलायक पुरावा सादर केल्यास सदर अर्जदारास फक्त गॅससाठी शुभ्र शिधापत्रिका देण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.