इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

पशुपालकांनी लाळखुरकत रोगाची घ्यावयाची काळजी व उपाययोजना

      कोल्हापूर दि. १७ : जिल्ह्यातील कांही तालुक्यामध्ये सध्या लाळखुरकत रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असून कोल्हापूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी पशुपालकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना सुचविल्या आहेत.
      लाळखुरकत हा दुभंगलेल्या खुरांच्या जनावरांमध्ये आढळणारा अति सांसर्गिक विषाणुजन्य आजार आहे. गुरे, शेळ्या, मेंढ्या, डुकरे आदी पाळीव प्राण्यांसोबतच हरीण, सांबर, रानडुकरे, रानरेडे यांच्यामध्येही हा रोग प्रामुख्याने दिसून येतो. रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोग झालेल्या जनावरांच्या तोंडातील लाळ, नाकातील स्त्राव यामुळे बाधीत चारा, पाणी, खाद्य, भांडी व सभोवतालची हवा यामुळे होतो. सार्वजनिक पाणवठे, चराऊ कुरणे, गुरांचे आठवडी बाजार, जत्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखाने अशा ठिकाणी लाळ आलेल्या जनावरांपासून निरोगी जनावरांमध्ये रोगप्रसार होतो.
      लाळ झालेल्या जनावरांमध्ये १०६ ते १०८ डिग्री फॅ. ताप येणे, तोंडातून लाळ गळणे, नाकातून स्त्राव वाहणे, जिभेवर, खुरांच्या बेचक्यात, कासेवर फोड येऊन ते फुटल्यामुळे जखमा होऊन जनावरांचे खाणे-पिणे बंद होणे व लंगडणे अशी लाळखुरकतमध्ये लक्षणे दिसून येतात. जनावरांचे मर्तुकीचे प्रमाण अल्प असले तरीही लहान वासरात व संकरीत जनावरांत मर्तुक दिसून येते.
आजारी जनावरांची घ्यावयाची काळजी
      आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून ताबडतोब वेगळे करावे. त्यांची पाण्याची तसेच खाद्याची भांडी वेगळी ठेवावी. तोंडातील जखमांवर खाण्याचा सोडा, हळद व गोडेतेल यांचे मिश्रण लावावे. दोन टक्के पोटॅशियम परमँग्नेटच्या सौम्य द्गावणाने पायातील व तोंडातील जखमा धुवाव्यात. जनावरांना खाण्यासाठी ऊसाचे वाडे अथवा कठीण वैरणीऐजजी मऊ गवत व तत्सम हिरवी वैरण द्यावी. गूळ घालून तयार केलेली नाचणी व ताकापासूनची आंबील योग्य प्रमाणात पाजावी. गोठ्यात व परिसरात चुन्याची फक्की मारावी. तसेच ४ टक्के धुण्याच्या सोड्याच्या द्गावणाची फवारणी करावी. प्रतिजैवके, ताप व वेदनाशामक औषधांनी उपचार करावा. आजारी व निरोगी जनावरे एकाच पाणवठ्यावर, चराऊ रानात आणू नयेत. आजारी जनावरांचे दूध उकळून, थंड करुन कोमट स्थितीत वासरांना द्यावे. शक्यतो वासरांना कासेला पाजू नये. गोठ्यातील जनावरांना लाळ आल्यास इतर जनावरांना ताबडतोब लसीकरण करण्याची घाई करु नये. प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून किमान दोनवेळा करुन घ्यावे.
      जनावरांना उपचाराकरिता तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. जिल्हा स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त दूरध्वनी क्रमांक ०२३१/२६२२७८२, २६२६५४३, मोबाईल ९४२३७२५६५९ तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दूरध्वनी क्रमांक ०२३१/२६५२३३१ मोबाईल ९८२२३९८७७३ यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.