इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २८ जून, २०१२

काविळीची साथ पसरु नये यासाठी काटेकोर नियोजन करा -- विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख

कोल्हापूर, दि. 26 - काविळीची साथ पसरु नये यासाठी काटेकोर नियोजन करा आणि त्याची पूर्ण अंमलबजावणी करा, असे आदेश विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकार्‍यांना दिले.
काविळीच्या साथीवर केलेली उपाययोजना आणि साथ पसरु नये यासाठी केलेला आराखडा याचा आढावा घेण्यासाठी श्री. देशमुख यांनी आज जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात झालेल्या या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख यांनी इचलकरंजी नगरपालिका, जिल्ह्यातील इतर नगरपालिका आणि ग्रामीण भागात काविळीचे किती रुग्ण आहेत, त्यापैकी किती गंभीर आहेत आणि त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत याबाबत माहिती दररोज मिळायला हवी ही कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकत्रित करुन पाठवायला हवी, असे सांगितले.
इचलकरंजीतील काविळीची साथ प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे झालेली आहे त्यामुळे नदीच्या पात्रात दुषित पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कार्यवाही करायला हवी, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. कोल्हापूर महानगरपालिकेने दूषित पाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यास प्राधान्य द्यायला हवे. पाणी आणि आरोग्य याबाबींना प्राधान्य देवून महानगरपालिकेने काम करावे, असे श्री. देशमुख यांनी आयुक्त बिदरी यांना सांगितले. जे कारखाने नदीपात्रात सांडपाणी प्रक्रीया न करता सोडतात त्यांच्यावर ठोस कारवाई करा असे आदेश त्यांनी यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले.
शतकोटी वृक्ष लागवडीबाबतही श्री. देशमुख यांनी यावेळी आढावा घेतला. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, देवस्थानच्या जमिनी, गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये यांच्या परिसरात वृक्ष लागवडीसाठी नियोजन करा, वृक्ष लागवडीसाठी ग्रामस्थ, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करुन घ्या, वृक्ष लागवड करण्याचे प्रशिक्षणही सर्व संबंधितांना द्या अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या. यावेळी सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.