इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १६ जून, २०१२

इचलकंरजीतील काविळीने मृतांच्या वारसांना एक लाख : औषधे खरेदी , उपचारापोटी खर्चासाठी एक कोटी अतिदक्षता कक्षासाठी पावणेसहा कोटी देणार - पालकमंत्री


कोल्हापूर दि. 16: इचलकरंजीतील इंदिरा गांधी मेमोरिअल रूग्णालयात अतिदक्षता कक्ष उभारण्यासाठी विशेष बाब म्हणुन पाच कोटी 75 लाख रुपये तत्काळ दिले जातील, अशी घोषणा सहकार संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज इचलकरंजी येथे दिली. त्याचबरोबर काविळीवर खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या खर्चापोटी आणि औषधांच्या खरेदीसाठी एक कोटी रुपये दिले जातील असेही श्री. पाटील यांनी आज सांगितले.
इचलकरंजीतील काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. पाटील आज इचकरंजीत आले होते. त्यांनी इचलकरंजी पालिकेत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केल्या.
श्री. पाटील यांनी सांगितले, काविळीच्या साथीबाबत राज्य शासन अतिशय गंभीर आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन तातडीचे आणि दूरगामी अशाप्रकारे उपाययोजना आखत आहे. तातडीच्या उपाययोजनांमध्ये काविळीने मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून दिले जातील. याबाबतची कार्यवाही येत्या चार-पाच दिवसात केली जाईल. औषधांच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून दहा लाख रुपयांस यापुर्वीच मंजुरी दिली आहे. त्यापैकी साडे सहा लाख रुपयांची औषधांची खरेदी करण्यात आली आहे. रुग्णांवर जलदगतीने उपचार होण्यासाठी इचलकरंजीत वीस ते पंचवीस डॉक्टरांचे एक पथक पाठविण्यात येईल.
 दूरगामी उपाययोजनांमध्ये इंदिरा गांधी रुग्णालयात रक्त-लघवी आणि इतर विविध प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी कायमस्वरुपी आणि सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यासाठी  प्रयत्न केला जाईल. यासाठी नगरपालिका प्रशासनाने प्रस्ताव द्यावा. जिल्हा नियोजन निधीतून पैसे देऊ. काविळीने आजारी असणार्‍या केशरी रंगाच्या शिधापत्रिका धारकांना 15 किलो अतिरिक्त धान्य दिले जाईल. त्याचबरोबर 12 हजार लिटर रॉकेलचा पुरवठा केला जाईल. तसेच इचलकरंजीसाठी आणखी जादा दहा हजार लिटर रॉकेलचा पुरवठा करावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
इचलकरंजीतील काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी खासगी व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांनीही योगदान द्यायला हवे. त्यांनी दिवसातून किमान दोन तास सार्वजनिक उपचारासाठी द्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली. आमदार सा. रे. पाटील यांनी दत्त सहकारी साखर कारखान्यामार्फत काविळीवरील उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत आणि डॉक्टरांची सेवा उपलब्ध करुन देतो असे सांगितले. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार जयवंतराव आवळे, आमदार सा. रे. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा रत्नाप्रभा भागवत, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हेसेकर, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमर दुर्गुळे आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.