सोमवार, १८ जून, २०१२

विद्यापीठांनी सल्ला देण्याचे कार्यही करायला हवे -- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे

         कोल्हापूर दि. 18 : विद्यापीठांनी विविध औद्योगिक संघटना आणि घटक यांना सल्ला देण्याचे कामही करायला हवे, अशी अपेक्षा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे व्यक्त केली.
      शिवाजी विद्यापीठातील मॅन्युस्क्रिप्ट सेंटर आणि कॉम्प्युटर डाटा सेंटरचे आज श्री. टोपे यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. त्यापूर्वी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर, आणि विविध विभागाचे प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
      श्री.टोपे म्हणाले, 'शिवाजी विद्यापीठाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात शिवाजी विद्यापीठाने विविध उपक्रम राबविले आहेत. हे सर्व उपक्रम विद्यापीठाची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. पण विद्यापीठाकडे अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आहेत. त्यांच्या आधारे शिवाजी विद्यापीठाने सल्ला देण्याचे कार्यही करायला हवे.' मिटकॉन ही संस्था सल्ला देण्याच्या कामातून दरवर्षी 40 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. त्याप्रमाणेच शिवाजी विद्यापीठांनेही काम करायला हवे.'
      यावेळी कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांनी श्री. टोपे यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.