इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, १५ जून, २०१२

गुलाबफुल देऊन विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत


कोल्हापूर दि. 15: नवी शाळा, नवी कोरी पुस्तके आणि गुलाबाचे फुल घेऊन होणार्‍या स्वागतामुळे पहिलीतील विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून गेले होते. पुस्तके घेण्यासाठी आणि ती उघडून पाहण्यासाठीची लगबग आणि शाळेप्रती असणारी उत्सूकता विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरुन ओसंडून वाहत होती. हे चित्र होते करवीर तालुक्यातील देवाळे विद्यामंदीर येथील. गेली काही वर्षे शाळेत येणाार्‍या विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात येते. त्यानुसार आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पहिलीतील विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. त्यांच्या या स्वागताने पहिलीतील मुलांचे चेहरे आनंदाने उजळून तर गेले होतेच. पण त्यांना शाळेत येण्याची, वर्गात बसण्याची उत्सुकता असल्याचे जाणवत होते.
       डॉ. म्हैसेकर यांनी मुलांचे स्वागत तर केलेच त्याचबरोबर त्यांना नवीन पुस्तकांचे वितरणही केले. त्यांच्या हस्ते शिष्यवृत्ती पटकावणार्‍या आणि विशेष गुणवत्ता प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात अला. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या गुणवत्ता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आम्ही मूल्याधारित शिक्षणावर भर देत आहोतच. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि गणित या विषयावरती भर द्यायला हवा. शिक्षकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गणित आणि इंग्रजी या विषयाची तयारी करुन घ्यावी.
       यावेळी सरपंच सविता पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी एम. आय. सुतार, विस्तार अधिकारी आर. वाय. पाटील, मुख्याध्यापक सुरेश कोळी, शामराव पाटील आदी उपस्थित होते. शिक्षक धनाजी पाटील यांनी संयोजन आणि सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.