इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५



मतदार याद्यांचा विशेष संक्षीप्त पुन:रिक्षण कार्यक्रम
जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपासून 
                                             -- जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी
11 व 18 ऑक्टोबरला विशेष मोहिम

कोल्हापूर दि. 3: भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 1 जानेवारी 2016 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षीप्त पुन:रिक्षण कार्यक्रम 8 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येणार असून 8 ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलतांना सांगितले.
छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षीप्त पुन:रिक्षण कार्यक्रमानुसार 8 ऑक्टोबर 2015 रोजी - प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी,  8 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर - दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, 14 ऑक्टोबर रोजी मतदार याद्यांमधील संबंधित ग्रामसभा, स्थानिक संस्थांत वाचन व नावांची खातरजमा करणे, 11 व 18 ऑक्टोबर या दोन दिवशी विशेष मोहिम, 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, 24 डिसेंबरपर्यंत डाटाबेसचे अदययावतीकरण आणि 16 जानेवारी 2016 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी होईल.
मतदार याद्यांचा विशेष संक्षीप्त पुन:रिक्षण कार्यक्रम हा कोल्हापूर महानगरपालिकेसाठी होत असलेल्या निवडणूक कार्यक्रमांशी निगडीत नसल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, 16 जानेवारी 2016 रोजी प्रसिध्द होणारी अंतिम मतदार यादी ही सन 2016 व 2017 मध्ये सुरुवातीच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मूळ मतदार यादी म्हणून वापरण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याने मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करावी, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, मतदारांनी त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे मतदान मदत केंद्रावर फॉर्म भरुन द्यावेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म -6, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी फॉम-7, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी फॉर्म-8 आणि मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी फॉर्म 8 अ मतदान मदत केंद्रांवर मिळतील.
21 जानेवारी 2015 रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 29 लाख 28 हजार 883 इतके मतदार असून, यामध्ये 15 लाख 13 हजार 706 स्त्री मतदार, 14 लाख 15 हजार 117 पुरुष मतदार आणि 60 इतर मतदारांचा समावेश आहे. यामध्ये विधानसभा मतदार संघनिहाय एकूण मतदार पुढीलप्रमाणे   आहेत. 271 चंदगड मतदार 3 लाख 32, 272 राधानगरी 3 लाख 6 हजार, 611, 273 कागल 2 लाख 99 हजार 851, 274 कोल्हापूर दक्षिण 3 लाख 12 हजार 29, 275 करवीर 2 लाख 90 हजार 453, 276 कोल्हापूर उत्तर 2 लाख 85 हजार 803, 277 शाहूवाडी 2 लाख 66 हजार 826, 278 हातकणंगले 3 लाख 4 हजार 940, 279 इचलकरंजी 2 लाख 71 हजार 250 आणि 280 शिरोळ 2 लाख 91 हजार 88 मतदार आहेत.
निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 22 जानेवारी  ते 15 सप्टेंबर 2015 अखेर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघात
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी  19 हजार 449 फॉर्म -6 प्राप्त आहेत. मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी 38 हजार 116 फॉर्म-7 प्राप्त, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी 9 हजार 258 फॉर्म-8 प्राप्त आणि मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी 1 हजार 411 फॉर्म 8 अ प्राप्त झाले आहेत.
या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान मदत केंद्र कार्यान्वित करण्यातआल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, विशेष मोहिमेच्या दिवशी सर्व मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित राहतील तसेच या मतदान केंद्रावर सर्व फॉर्म मिळतील. विशेष मोहिम काळात मतदान केंद्रांवर उपस्थित न राहणाऱ्या मतदान नोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तत्पूर्वी मतदार याद्यांचा विशेष संक्षीप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाबाबत जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीही विशेष बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या संपूर्ण कार्यक्रमाबाबत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.