इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५




कचरा व्यवस्थापन व हगंणदारीमुक्तीमध्ये
कागल नगरपरिषदेची कामगिरी प्रशसंनीय
                             - प्रधान सचिव मीता राजीवलोचन

     कोल्हापूर, दि. 17 :   कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानात अतिशय चांगली कामगिरी केली आहे. या कार्यक्रमात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश केला असल्याने नगरपरिषद ही 100 टक्के कचरा व्यवस्थापन व 100 टक्के हगणदारीमुक्त करण्यात यशस्वी ठरली आहे.  त्यांच्या या कामगिरीमुळे स्वच्छ भारत अभियानाला निश्चितपणे गती मिळेल, असा विश्वासही नगर परिषद प्रशासन संचालनालयच्या प्रधान सचिव मीता राजीवलोचन यांनी एक पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
     स्वच्छ भारत अभियानांतर्गत कागल परिषदेने केलेल्या कामगिरीचा अहवाल नगराध्यक्षा संगीता प्रकाश गाडेकर आणि मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांच्या तर्फे प्रधान सचिव नगर परिषद प्रशासन संचालनालय यांना कागल नगर परिषदेतर्फे पाठविण्यात आला होता. यामध्ये अभियनांतर्गत केलेल्या कामगिरीचा तपशील देण्यात आला असून कागल नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेली कार्यवाही ही शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या प्रभागापासून सुरु केली. झोपडपट्टी भागात कचरा आणि दुर्गंधी यांचे साम्राज्य होते. दलदल, तुंबलेल्या गटारी, रस्त्यांच्या कढेला शौचास बसणारे नागरिक असे चित्र होते. पण नगरपालिकेने स्वच्छता मोहिम हाती घेतल्यानंतर नागरिकांमध्ये हळूहळू जनजागृती होवू लागली. तरुण वर्ग, महिला उर्त्स्फूतपणे रस्ते सफाई, तण काढणे, नाले सफाई, वृक्षारोपण आदी कामांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यामुळे आज या परिसराचे संपूर्ण चित्रच पालटले आहे. झोपडपट्टी भागापासून कचरा वर्गीकरण करणे, घंटागाडीद्वारे कचरा उचलणे व कचरा कुंडीमुक्त क्षेत्र करणे याचे समाधानकारक अंमलबजावणी केली. त्यामुळे झोपडपट्टी प्रभागातून ऑक्टोबर 2015 अखेर 100 टक्के कचरा संकलन होते.
     नगर परिषद क्षेत्रांतर्गत 8 हजार 300 कुटुंबे असून 7 हजार 795 कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय उपलब्ध आहेत. तर 219 सार्वजनिक शौचालय उपलब्ध आहेत, त्यामुळे एकही कुटुंब उघड्यावर शौचास जात नाही. 5 ऑक्टोबर रोजी सर्वसाधारण कौंन्सिल सभेमध्ये कागल शहर 100 टक्के हगणंदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे.   दैनंदिन घनकचरा 100 टक्के संकलन करणे व त्याचे विलगीकरण करणे यासाठी कार्यक्षम प्रणाली सुरु आहे. कचरा उचलण्याचा ठेका राजकीय हस्तक्षेपाशिवाय देण्यात आल्याने जनतेला चांगली सेवा देता येते प्रतिदीन 70 टन कचरा संकलित करण्यात येतो. नगरपरिषदेने नाविन्यपूर्ण योजनेतून घनकचऱ्यापासून खत निर्मिती व वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पातंर्गत शुन्य कचरा ही संकल्पना लवकरच पूर्णत्वास येणार  असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

00 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.