इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५



कोडोली ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही प्रकल्पास
जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य
                                         -- जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी

कोल्हापूर, दि. 14 : कोडोली ग्रामपंचायतीने सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा जोपासण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही प्रकल्प सुरु केला असून या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी जिल्हा  प्रशासनाचे आवश्यक ते सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी येथे बोलताना केले.
कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने 3 लाख रुपये खर्चून गावात देशातील पहिल्या सीसीटीव्ही प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील 17 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी,  पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख माजी मंत्री विनय कोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पंचायत समितीचे सभापती सुनिता पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, सायबर तज्ञ संदीप पाटील आदीजण उपस्थित होते.
शांतता आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्प अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने आपल्या कर्तृत्व आणि उपक्रमशिलतेतून कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे. कोडोली गावानेही सीसीटीव्ही उक्रम ग्रामीण भागात सर्वप्रथम सुरु करुन कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकाचा आहे. या उपक्रमातून सामाजिक सलोखा वृध्दींगत करण्यासाठी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. गावातील बांधकाम परवाना आणि घरफाळा वसुलीबाबत शासनाचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याचेही ते म्हणाले.
 पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा या प्रसंगी बोलताना म्हणाले, कोडोली गावाने सीसीटीव्ही बसविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन पोलीस दलाला सहकार्य केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या कामी कोडोली ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार महत्वाचा असून हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविणे सोईचे होणार असल्याचेही ते म्हणाले.
 वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख माजी मंत्री विनय कोरे याप्रसंगी बोलतांना म्हणाले, सीसीटीव्ही उपक्रमाद्वारे गावाला सुरक्षिततेचं कवच निर्माण होत असून गावाचे संरक्षण आणि गावातील सामाजिक सुरक्षिततेला उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प आहे. यापुढील काळात संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत पुढाकार घेतला जाईल. गावातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी आणि समस्या नोंदवून त्यांच्या सोडवणूकीसाठी कोडोली ग्रामपंचातीचा ई-पोर्टल तयार केला जाईल, त्यामुळे प्रशासनात सामान्य माणसाचा प्रत्यक्षपणे सहभाग वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सायबर तज्ञ संदीप पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सरंपच विद्यानंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी उपसरपंच नितीन कापरे यांनी आभार मानले. समारंभास गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे, समीर कदम यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

00000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.