इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५



सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कोडोलीवर नजर

     शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा जोपासण्याच्या मुख्य उद्देशाने गाव पातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा देशातील बहुतांशी पहिलाच प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात साकारला आहे. या उपक्रमामुळे कोडोली गाव भारताच्या नकाशावर झळकले आहे. पहिल्या टप्प्यात 17 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गावासाठी सुरक्षा कवच निर्माण करण्याचा मान कोडोली ग्रामपंचायतीने पटकाविला आहे.

कोल्हापूर शहरापासून 20 ते 25 किलो मीटर अंतरावर असलेल्या कोडोली गावाने आजपर्यंत ग्राम स्वच्छता, निर्मल ग्राम, तंटामुक्त ग्राम अशा विविध योजना आणि अभियानात सक्रीय सहभाग घेऊन अव्वल स्थान निर्माण केले आहे. वारणा परिसरात वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. समृध्द, सुसंस्कृत आणि संपन्न गावाचा आरसा या परिसरातील गावांनी निर्माण केला आहे. एकेकाळी फोंडा माळ असणाऱ्या या परिसरात दिवंगत तात्यासाहेब कोरे यांच्या कर्तृत्वातून विकासाचं आणि ग्रामीण आर्थिक परिवर्तनाच नवं माध्यम निर्माण झालं आहे. त्यामुळेच अनेक गावे राज्य शासनाचे नानाविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात सक्रीय झाली आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे गावामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा उपक्रम.
     कोडोली गाव हे आत्ता बागयती गाव म्हणून ओळखले जात आहे.  मोठी व्यापर पेठ आणि सहकार आणि शिक्षणाचं विनलेलं जाळ पाहता आज वारणा परिसराकडे कौतुकाने पाहिले जात आहे. आणि आता तर कोडोली गावाने सीसीटीव्ही बसवून देशाच्या इतिहासात नोंद केली आहे. या उपक्रमाविषयी बोलताना सरपंच विद्यानंद पाटील म्हणाले, कोडोली गावाचा झपाट्याने विकास होत असून गावात नवे नवे उपक्रम राबवून कोडोली गाव सर्वक्षेत्रात अव्वल बनविण्याचा प्रयत्न आहे. गावात शांतता, सुव्यवस्था, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने कोडोलीचे सुपूत्र आणि सायबर तज्ञ संदीप पाटील यांच्या सक्रीय पुढाकाराने कोडोली गावात ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही बसविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे धाडस केले. कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने गावात पहिल्य टप्प्यात 3 लाख रुपये खर्चून देशातील पहिला सीसीटीव्ही प्रकल्प उभारला असून तो यशस्वी झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जवळ पास 60 कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले असून यासाठी लागणारा जवळपास 20 ते 25 लाखाचा निधी शासन स्तरावरुन उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येणार आहे. यामुळे गावात शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा निश्चितपणे निर्माण होऊन अन्य गावांना कोडोली गाव प्रेरणादायी ठरेल.
     कोडोली गावाने स्वंयर्स्फृतिने विकसित केलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पहिल्या टप्यातील 17 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शुभारंभ घटस्थापनेच्या शुभमुर्हतावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी,  पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख माजी मंत्री विनय कोरे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पंचायत समितीचे सभापती सुनिता पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, सायबर तज्ञ संदीप पाटील आदीजण मान्यवरांनी उपस्थिती लावली.
शांतता आणि सुरक्षिततेसाठी कोडोली ग्रामपंचायतीन उभारलेला सीसीटीव्ही प्रकल्प अतिशय उपयुक्त असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने आपल्या कर्तृत्व आणि उपक्रमशिलतेतून कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे. कोडोली गावानेही सीसीटीव्ही उपक्रम ग्रामीण भागात सर्वप्रथम सुरु करुन कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकाचा आहे.   वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख माजी मंत्री विनय कोरे याप्रसंगी बोलतांना म्हणाले, सीसीटीव्ही उपक्रमाद्वारे गावाला सुरक्षिततेचं कवच निर्माण होत असून गावाचे संरक्षण आणि गावातील सामाजिक सुरक्षिततेला उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प आहे.
     कोडोली ग्रामपंचायतीने काळाची पावले ओळखून भविष्याचा वेध घेत गावाच्या शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा जोपासून तो वृंध्दीगत करण्यासाठी गावात राबविलेल्या सीसीटीव्ही उपक्रमाचे आज नागरीकांकडून कौतुक होत आहे. भविष्यात हा उपक्रम अन्य गावातही हाती घेऊन संपूर्ण जिल्हाचा सीसीटीव्ही युक्त जिल्हाच निर्माण होईल यात मात्र शंका नाही. मात्र यासाठी कोडोली ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी घेतलेले परिश्रम दाखविलेले धाडस आणि जोपासलेला एकोपा महत्वाचा वाटतो.
                                                                                      एस.आर.माने
                                                                                    माहिती अधिकारी

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.