इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५




हागणदारीमुक्त पन्हाळा


सहयाद्रीच्या कुशीत असलेल्या आणि दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्यावर पन्हाळा नगरपालिकेने इतिहासाच्या पाऊलखुणा जोपासत आपलं वेगळंपण सातत्यपूर्ण जोपासलं आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य शासनाच्या सप्तपदी स्वच्छतेची  या महत्वाकांक्षी कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी होऊन पन्हाळा नगरपरिषदेनं स्वच्छतेचं भरीव काम करुन;  पन्हाळा शहर हागणदारीमुक्त शहर म्हणून लौकीक निर्माण केला आहे.


कोल्हापूर शहरापासून अवघ्या 18 किलोमिटरवर असलेल्या पन्हाळा शहर अर्थात पन्हाळा किल्ल्यास फारमोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचे प्रमुख ठिकाण असलेल्या पन्हाळा किल्याचा परीघ 7.3 चौरस किलोमिटर आहे. या किल्याचा काही भाग प्रचंड नैसर्गिक कडयांनी सुरक्षीत असून चार दरवाजा, तीन दरवाजा आणि वाघ दरवाजा ही या किल्याची मुख्य प्रवेशव्दारे आजही इतिहासाची साक्ष देत आहेत. काही ऐतिहासिक दाखल्यावरुन इ. स. 1191-92 मध्ये सिंयहरा भोजराजा यांचे पन्हाळयावर अधिष्ठान होतं, त्यांनीच हा किल्ला बांधला असावा असे मानले जाते. त्यानंतर अनेक उलथापालथी या पन्हाळा किल्यावर झाल्या.
पन्हाळा नगरपरिषदेने आतापर्यंत विविध अभियाने राबवून अनेक पुरस्कार मिळविले. कचरामुक्त शहर, प्लास्टीकमुक्त शहर,पर्यावरणपुरक शहर अशा अनेक घटकांमध्ये पन्हाळा नगरपरिषदेने कित्येकदा लौकीक प्राप्त केला आहे. आता तर देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा प्राधान्य क्रमाचा आणि लौकीकप्राप्त ठरलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या नागरी क्षेत्रात राबविलेल्या सप्तपदी स्वच्छतेची या महत्वाकांक्षी कार्यक्रमात राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा हागंणदारीमुक्त शहर पुरस्काराचा मानाचा तुरा पन्हाळा नगरपरिषदेच्या शिरपेचात खोवला गेला, ही पन्हाळा शहरवासियांच्यादृष्टीनेच नव्हे तर कोल्हापूर जिल्हयाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.
गर्द वक्षराजी, दाट धुक्कं, नागमोडी वळणं, थंड हवा आणि धरतीवरचा स्वर्ग अशा स्वच्छ-सुंदर पन्हाळयाचा सहवास सर्वांनाच विशेषत: पर्यटकांना हवा-हवासा वाटणारा असाच आहे. वाघबीळावरुन वर येताना गर्द झाडी आणि नागमोडी वळणांनी पन्हाळयावर प्रवेशतांना थंड हवेची झुळूक जाणवू लागते. दाट धुकं आणि वाऱ्याच्या झुळूकेनं मन प्रसन्न होतं. अशा या पन्हाळयावर नगरपरिषदेनं सप्तपदी स्वच्छतेची या उपक्रमातून स्वच्छ, सुंदर, समृध्द आणि आरोग्य संपन्न पन्हाळा शहर बनविण्याचा ध्यास घेऊन स्वच्छता विशेषत: हागंणदारीमुक्त अभियान गतीमान केले. स्वच्छतेचा वसा आणि वारसा असलेल्या पन्हाळा शहरवासियांनी हे अभियान मनापासून राबविले, नगराध्यक्ष असिफ मोकाशी आणि मुख्याधिकारी शाम गोसावी यांच्या हागंणदारीमुक्त पन्हाळा या हाकेला शहरावासीयांची साथ लाभल्याने स्वच्छतेची मोहिम युध्दपातळीवर राबविल्याने पन्हाळा नगरपरिषद हागंणदारीमुक्त शहर झाले.
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पन्हाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक-नगरसेविकांनी शहरवासियांच्या सहकार्यातून भव्य एकता दौड काढून स्वच्छतेची शपथ घेतली आणि मग खऱ्या अर्थांने पन्हाळा शहर हागणदारीमुक्त होण्यास नवी दिशा आणि गती लाभली. हागणदारीमुक्तीची सुरुवात ही कचरामुक्त पन्हाळयाने करण्यात आली. पन्हाळा शहर कचरामुक्त करण्याच्यादृष्टीने दैनंदिन निर्माण होणारा ओला व सुका कचरा यांची योग्य विल्हेवाट लावण्यास प्राधान्य देण्यात आले. यासाठी नागरिकांवर काही निर्बंधही लादले गेले, पण सुजाण पन्हाळकरांनी कचरामुक्त पन्हाळयासाठी निर्बंधांचे ओझे न मानता त्याला आपलंस करुन कचरामुक्तीत योगदान दिल्याने कचरामुक्त पन्हाळा निर्माण होण्यास वेळ लागला नाही.
कचरामुक्ती पाठोपाठ प्लास्टीकमुक्तीचा विडाही पन्हाळकरांनी उचलला, त्यानुसार सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक यांच्या सक्रीय सहकार्यातून प्लास्टीकमुक्तीचा संदेश घराघरापर्यंत आणि घरातील प्रत्येकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून प्लास्टीकमुक्त पन्हाळयाची नवी ओळख निर्माण करण्यात नगरपरिषदेला यश आले. ही सर्व अभियाने राबविता राबविता राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या पुढाकाराने जून महिन्यात कोल्हापूर विभागाच्या स्वच्छतेची सप्तपदी या कार्यक्रमातून पन्हाळा नगरपरिषदेनं बोध घेऊन हागणदारी मुक्तीचा विडा उचलला. यासाठी सुक्ष्म नियोजन आणि निश्चित कार्यक्रम तयार करुन पन्हाळा शहरात उघडयावर शौचास कोणी बसणार नाही याचे नियेाजन केले, केवळ कागदावरच नियोजन करुन ही मंडळी थांबली नाहीत, तर घरं तिथं शौचालय तसेच सार्वजनिक शौचालये निर्माण करुन कोणीही उघडयावर शौचास बसणार नाही याची दक्षता घेतली.

            सप्तपदी स्वच्छतेची
          'स्वच्छ महाराष्ट्राचा' संकल्प करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी स्वच्छ व हरित महाराष्ट्रासाठी प्रशासन सक्रीय केलं. राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधानसचिव आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या नोडल सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर यांनी सप्तपदी स्वच्छतेची या उपक्रमातून सारा महाराष्ट्र पिंजून काढला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विभागावर सप्तपदी स्वच्छतेसाठीच्या कार्यशाळा घेऊन लोकसहभाग वाढविल्यामुळेच राज्यातील शहरांनी कचरामुक्ती, प्लॉस्टिकमुक्ती बरोबरच हागणदारीमुक्ती कार्यक्रमात अव्वलस्थान निर्माण केलं आहे. हे यश केवळ सप्तपदी स्वच्छतेचंच!

पन्हाळा नगरपरिषद क्षेत्रात 667 कुटुंबे असून या सर्व कुटुंबांना शौचालये उपलब्ध करुन देण्यात नगरपरिषदेने पहिल्यापासूनच पुढाकार घेतला. यापैकी 557 कुटंुबाकडे शौचालये उपलब्ध होती, उर्वरित 110 कुटुंबांना शौचालये उपलब्ध करुन देणे महत्वाचे होते. यासाठी नगरपरिषदेनं काही ठिकाणी सार्वजनिक तसेच वैयक्तीक शौचालये निर्माण केल्याने बहुतांशी नागरिकांना हक्काचे शौचालय उपलब्ध झाले. तरीही 18 कुटुंबे शौचालयाअभावी उघडयावर शौचास जात होती. या 18 कुटुंबांना शौचालयाचे महत्व पटवून सांगितल्याने 9 कुटुंबांनी शौचालये उभारली, उर्वरित 9 कुटुंबांना शौचालय उभारण्यासाठी नगरपरिषदेनं प्रत्येकी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत स्वत:च्या फंडातून उपलब्ध करुन दिली, आणि बघता बघता याही 9 कुटुंबांना स्वत:चे शौचालय उपलब्ध झाले. आता सर्वच पन्हाळकरांना शौचालयाची सुविधा उपलब्ध झाल्याने कोणीही उघडयावर शौचास जाण्याचा प्रश्नच उरला नाही, आणि संपूर्ण पन्हाळा शहर हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाले.
शासन योजनेंतर्गत अनुदान आणि नगरपरिषदेचा निधी यामुळे शौचालयाची उभारणी करणे नागरिकांना सहज शक्य झालं. त्यामुळेच लोकांना स्वच्छतेची चांगली सवय जडली गेली. सार्वजनिक तसेच वैयक्तिक शौचालयाचा वापर वाढल्याने उघडयावर शौचास जाण्याची प्रथा अर्थात सवय बंद होण्यास मदत झाली. सार्वजनिक शौचालयाचा परिणामकारक वापर वाढविण्यासाठी या शौचालयाची दैनंदिन देखभाल करण्यास नगरपरिषदेन सर्वाेच्च प्राधान्य दिले. तसेच सार्वजनिक शौचालयाकडे जाणरा रस्ता, पुरेसं पाणी, वीज  आदि व्यवस्थांनाही नगरपरिषेदेनं प्राधान्य दिल्याने स्वच्छतेची बिजे शहरवासियांच्यात रुजण्यास मदत झाली.
लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेलं स्वच्छ, हरित आणि निसर्गरम्य पन्हाळा शहर स्वच्छ, सुंदरतेबरोबरच हागणदारीमुक्त पन्हाळा शहर विकसित करण्यात पन्हाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी आणि मुख्याधिकारी शाम गोसावी यांनी उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि शहरवासियांना बरोबर घेऊन केलेलं काम विशेष गौरवणीय असंच झालं.
-          एस. आर. माने

-          माहिती अधिकारी, कोल्हापूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.