इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० जुलै, २०१९

श्रावणषष्ठी यात्रा पावसाची परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक उपाय योजना करा जिल्हाधिकारी दौलत देसाई



सर्व यंत्रणांनी  परस्पर समन्वयाव्दारे यात्रा सुरळीतपणे पार पडावी

-          
कोल्हापूर, दि. 30 :  श्री चोपडाईदेवी श्रावणषष्ठी यात्रा कालावधीत पासवासाची परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक उपाय योजना करा तसेच यात्रा कालावधीत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन श्रावणषष्ठी यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
 श्री वाडीरत्नागिरी येथील श्री चोपडाईदेवी श्रावणषष्ठी यात्रा- 2019 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जोतिबा डोंगर येथील एमटीडीसीच्या सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, प्रांताधिकारी अमित माळी, पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, तहसिलदार रमेश शेंडगे, देवस्थान कमिटीच्या सदस्या संगीता खाडे, शिवाजी पाटील, सचिव विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, उपसरपंच शिवाजी सांगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रावणषष्ठी यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावी, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी अधिक सज्ज आणि सतर्क रहावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, पावसाळा आणि पावसाची परिस्थिती विचारात घेऊन संभाव्य काळात अचानकपणे उदभवणाऱ्या धोक्यांचा अभ्यास करुन यात्रा कालावधीत परस्पर समन्वय ठेवून कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर अधिक भर द्यावा. यामध्ये देवस्थान समिती, महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आदि विभागांनी अधिक दक्षता घ्यावी. जेणे करुन श्रावण षष्ठी यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात तसेच सुरळित आणि सुरक्षितपणे पार पडेल.
  यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, भाविकांसाठी चारचाकी तसेच दोन चाकीवाहनांसाठी स्वतंत्रपणे पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून 14 ठिकाणी पार्किंग स्पॉट निश्चित केले आहेत. याबरोबरच  वाहतूक व्यवस्था, दर्शनरांग, बरॅकेटिंग, सुरक्षा व्यवस्था, पाणीपुरवठा स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, विद्युत, रस्ते, हॉटेलमधील खाद्य पदार्थाची तपासणी  आदि सर्व व्यवस्थांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. या सर्व कामात प्रशासकीय यंत्रणांना विविध स्वयंसेवी - सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून होत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पावसाळा आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी
 सध्या पावसाचे अधिक प्रमाण असून पावसाळयातील आजाराबाबत प्रतिबंधक उपाययोजनांना अधिक प्राधान्य द्यावे, याबाबत  आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, आरोग्य विभागाने साथीच्या आजाराबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, पुरेसा औषधांचा आणि लसींचा साठा उपलब्ध करण्याबरोबरच पाणी शुध्दीकरणास प्राधान्य द्यावे,  यात्रा कालावधीत टीसीएल, तुरटीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आवश्यक कार्यवाही करावी तसेच अन्न, औषध प्रशासन विभागाने हॉटेल्स, अन्न पदार्थांचे स्टॉल्स, दुकाने यांची तपासणी करावी, अशी सूचना त्यानी केली.
यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा अधिक दक्ष आणि सतर्क राहील, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, याकामी पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान तसेच सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकाची मदत घ्यावी, यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेऊन सुरक्षिततेच्यादृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजनांना प्राधान्य द्यावे.केले. सार्वजनिक‍ बांधकाम विभागाने पावसाळा विचारात घेऊन जोतिबाकडे येणाऱ्या सर्व मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, या विभागाने अधिक दक्ष राहून काम करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
यात्रा काळात पुरेसा पोलीस बंदोबस्त : अतिरिक्त पोलीस अधीक्षक
जोतिबा येथील श्रावण षष्ठी यात्रा येत्या 5 व 6 ऑगस्टला होत असून भाविकांची सुरक्षा सर्वार्थाने महत्वाची असून यात्रा काळात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे सांगून अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे म्हणाले, यात्रा कालावधीत पोलीस पथके, सीसीटीव्ही कॅमेरे, सुसज्ज व्हॅन, स्वतंत्रपणे नियंत्रण कक्ष याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. भुरटे चोर, पाकिटमार  यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस विभाग सतर्क आहेच, भाविकांची कसल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही, याचीही पोलीस दलामार्फत काळजी घेतली जाईल. याबरोबरच शहर वाहतूक शाखेच्यावतीनेही यात्रा कालावधीत पुरेसा प्रमाणात वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने यात्राकाळात तात्पुरी 70 शौचालये, 200 सुरक्षा रक्षक, 15 वॉकीटॉकी, 14 वाहनतळ, 32 सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, हॅलोजन, 40 एसटीबस, अग्निशमन यंत्रणा अशा सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मंदीरातील वीज कनेक्शन  आणि वायरिंगची तपासणी करुन घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केली.
या बैठकीत श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त करावयाच्या उपाययोजनांचा विभाग निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. याबैठकीस सर्व विभागांचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.