इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० जुलै, २०१९

चोपडाई देवी श्रावणषष्ठी यात्रेत नोंदणी दाखला घेऊनच स्टॉल लावावेत - सहाय्यक आयुक्त मो.शं. केंबळकर



कोल्हापूर, दि. 30 (जि.मा.का.) : श्रीक्षेत्र वाडीरत्नागिरी येथील चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा दिनांक 5 ते 6 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. भाविकांना भेसळविरहित खाद्यपदार्थ, अन्नपदार्थ पुरविण्यासाठी अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 अंतर्गत अन्नपरवाना, नोंदणी दाखला घेऊनच स्टॉल लावावेत. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मो.शं. केंबळकर यांनी दिला आहे.
       अन्न व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ तयार करताना त्यांच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ असल्याची खातरजमा करावी. खाद्य पदार्थासाठी लागणारे पाणी व गिऱ्हाईकांना देण्यात येणारे पाणी  पिण्यायोग्य असल्याची खातरजमा करावी. खाद्यपदार्थामध्ये बर्फाचा वापर करावयाचा झाल्यास परवानाधारक बर्फ उत्पादकाकडूनच खरेदी करून त्याबाबत बिल जपून ठेवावे. ज्या अन्न व्यावसायिकांकडे बर्फाची  खरेदी बिलं आढळून येणार नाहीत त्यांच्याकडील बर्फाचा साठा हा अखाद्य दर्जाचा समजून तो जागीच नष्ट करण्यात येईल. खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडील कर्मचारी वर्गाची वैद्यकीय तपासणी करून घेऊन प्रमाणपत्रे तसेच अन्नपरवाने, नोंदणी दाखले, कच्च्या अन्नपदार्थांची खरेदी बिले तपासणीकरिता उपलब्ध ठेवावीत.
          भजी, वडे यासारखे खाद्यपदार्थ  तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुर्नवापर 3 पेक्षा जास्तवेळा करू नये. पिण्याचे, खाद्यपदार्थ तयार करण्याकरिता जे पाणी उपयोगात आणण्यात येईल ते स्वच्छ भांड्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवलेले असावे. कोणत्याही परिस्थितीत शिळे,जास्त वेळ राहिलेले खाद्यपदार्थ, दुग्धजन्य पदार्थ गिऱ्हाईकांना सेवनास देऊ नये. अशा शिळ्या राहिलेल्या अन्नपदार्थामुळे अन्न विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तयार खाद्यपदार्थ नियमित झाकून ठेवावेत जेणेकरून ते माश्या, धूळ यापासून दूषित होणार नाहीत. शिळे अन्नपदार्थ वेळीच नष्ट करावेत,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.