इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २९ जुलै, २०१९

प्रगणक म्हणून स्थानिकांना संधी द्या -जिल्हाधिकारी दौलत देसाई






कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : 7 व्या राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये गणना करण्यासाठी प्रगणक नेमताना स्थानिकांना संधी द्या. त्यासाठी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांची मदत घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
       7 व्या राष्ट्रव्यापी गणनेअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले, संख्याशास्त्र विभाग प्रमुख हेमांगी कुलकर्णी, इचलकरंजीचे मुध्याधिकारी दिपक पाटील आदी उपस्थित होते.
          जिल्हा सांख्यिकी अधिकारी भूषण देशपांडे यांनी सुरवातीला सर्वांचे स्वागत करून संगणकीय सादरीकरण केले. 6 व्या आर्थिक गणनेमध्ये जिल्ह्यामध्ये 5 लाख 71 हजार अस्थापनांची नोंद करून राज्यात जिल्हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे. अस्थापनांमधील रोजगारांच्याबाबतीतही जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. हस्तव्यवसाय, हातमाग  क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकाचा वाटा जिल्ह्याचा आहे. कृषी क्षेत्रावर आधारीत आस्थापनांमधील रोजगाराबाबत राज्यात सर्वाधिक वाटा जिल्ह्याचा आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
          7 वी आर्थिक गणना स्थानिक स्तरावर नियोजन करण्यासाठी गाव, प्रभाग पातळीपर्यंत कार्यरत असणाऱ्या अस्थापनांचे भौगोलिक स्थान जोडून यादी तयार करण्यात येणार आहे. ही आर्थिक गणना सप्टेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल. यासाठी प्रथम स्तर पर्यवेक्षक त्यांच्या अधीन असतात. 2 ते 3 व्यक्ती प्रगणक म्हणून प्रत्यक्ष माहिती गोळा करतील. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेकडून 2 टक्के व राज्य शासनाच्या अर्थ व सांखिकी संचालनालयामार्फत 8 टक्के प्रगणकांचे व्दितीयस्तर पर्यवेक्षण केले जाईल.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधून मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, संख्याशास्त्र विषयाचे विद्यार्थी, संगणकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा या कामासाठी समन्वयाने उपयोग करून घ्या. स्थानिकांना  प्रगणक म्हणून संधी द्यावी जेणेकरून हे काम योग्य रीतीने पूर्ण होईल,असेही ते म्हणाले.
00000
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.