इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३१ जुलै, २०१९

भूमिगत वाहनतळ निर्मितीबाबत प्रस्ताव द्या -जिल्हाधिकारी दौलत देसाई




       कोल्हापूर, दि. 31 (जि.मा.का.) : शिवाजी स्टेडीयम येथे उत्पन्न वाढीसाठी तसेच महालक्ष्मी मंदिरासाठी येणाऱ्या भाविकांची सोय म्हणून भूमिगत वाहनतळ करता येणे शक्य आहे का याबाबत तांत्रिक बाबी तपासून प्रस्ताव द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
       जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक आज झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी सुरूवातीला सर्वांचे स्वागत करून विषय वाचन केले.
          जिल्हा क्रीडा संकुल येथील असणाऱ्या जलतरण तलावाच्या दुरूस्तीबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, जलतरण तलावाची दुरूस्ती करावी की नव्याने निर्मिती करावी याबाबत तीन आठवड्यामध्ये अहवाल सादर करावा. अत्यंत चांगल्या पध्दतीच्या सुविधा असणारा जलतरण तलाव करायला हवा. या ठिकाणी व्यायाम शाळा,स्टीम बाथ,सोना बाथ अशा सुविधा द्यायला हव्यात. त्याचबरोबर क्रीडा संकुल सौर उर्जेवर करण्याबाबत मेढाशी संपर्क साधावा.
          नवरात्रीच्या काळात क्रीडांगणाचा वापर वाहनतळ म्हणून केला जातो. याबाबत उत्पन्न वाढीसाठी विचार करून भूमिगत वाहनतळ होऊ शकते,असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, महालक्ष्मी मंदिरासाठी आणि स्टेडीयमसाठी याठिकाणी वाहनतळ करण्याबाबत प्रस्ताव सादर करा. त्याचबरोबर ज्या गाळेधारकांचा करार संपलेला आहे. त्यांच्यासोबत नवीन दराने करार करा. ज्या गाळेधारकांने पोट भाडेकरू ठेवला असेल त्याला काढून टाका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
          आजच्या बैठकीमध्ये जिल्हा क्रीडा संकुलाकडे मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 500 रूपयांनी वाढ करण्याचा तसेच रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये  1  हजार रूपयांची  वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला पोलीस उप अधीक्षक (गृह) अशोक पवार उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.