इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ३१ मे, २०२०

जिल्ह्यातील प्रत्येक केव्हिड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनसुविधा असणारे 10 बेड तर कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये 50 बेड -जिल्हाधिकारी दौलत देसाई




कोरोनाच्या उपचारासंबधी प्रोटोकॉलबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना व्हीसीव्दारे प्रशिक्षण

 कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्ह्यातील प्रत्येक केव्हिड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा असणारे 10 बेड तसेच कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह 50 बेड आणि प्रत्येक सेंटरला 2 डिजिटल ईसीजी मशिन्स लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज बोलतांना सांगितले.
      कोरोनाच्या उपचारासंबधी प्रोटोकॉलबाबत जिल्हयातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसाठी  तसेच खाजगी तालुका समन्वयक यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीव्दारे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई बोलत होते. कोरोनाच्या उपचारासंबधी प्रोटोकॉलबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सीपीआर हॉस्पिटल व राजर्षि शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्षयरोग व उरोरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सायबन्नावार, औषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही.बनसोडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुधीर सरवदे, मेडिसिन असोसिएट प्रोफेसर डॉ. अनिता परितेकर तसेच पुण्याच्या बीजे मे‍डिकल कॉलेजचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. कदम या  तज्ञांनी  व्हीसीव्दारे डॉक्टरांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले.
            या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आप्पती व्यवस्थापनाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केंम्पीपाटील, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुक देसाई यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्ह्यातील प्रत्येक कोव्हिड केअर सेंटर्समध्ये ऑक्सीजन सुविधेसह किमान 10 बेड आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह 50 बेड उपलबध करुन देण्यात येतील तसेच प्रत्येक कोव्हिड केअर सेंटर आणि  कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये प्रत्येकी 2 डिजिटल ईसीजी मशिन्स आणि पल्स ऑक्सीमीटर उपलब्ध करुन दिली जातील, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले की, जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेथरेट कमी आहे, तो कमीच राहीला पाहिजे, यासाठी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, जिल्हयात अद्याप सामुहिक संसर्ग झालेला नसून त्याला यापुढेही रोखून ठेवण्याचे काम आरोग्य अधिकाऱ्यांना करायचे आहे. तसेच यापुढे कोरानामुळे मृत्युदरही वाढू नये, यासाठी आपली सारी ताकद पणाला लावा, तालुकास्तरीय कोव्हिड केअर सेंटरमध्ये सिरियस पेशंट असल्यास त्याला सीपीआरकडे रिफर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील आरोग्‌य  विभागाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु आहे, ते यापुढेही  सुयोग्‌य समन्वय राखून गतीशिलता जोपासावी, आरोग्य यंत्रणेस आवश्यक त्या सुविधा आणि साधने उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी ग्वाही देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, कोरोना विरुध्दच्या युध्दात आपण निश्चितपणे जिंकू, अशा आत्मविश्वासाने सर्वानी कोरोनाला हरविण्यसाठी प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, याकामी आरोग्य यंत्रणेचे फार मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले. आरोग्य अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहण्याच्या व्यवस्थेसाठी शासकीय विश्रामगृहे तसेच प्रसंगी हॉटेल्स उपलब्ध् करुन देण्याचे निर्देश संबधितांना दिले असल्याचेही ते म्हणाले.
सद्यस्थितीत कोरोना आणि आगामी पावसाळा विचारात घेऊन आवश्यक आरोग्य यंत्रणा तैनात करण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, पावसाळयातील नित्याचे आजार आणि कोरोना याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहून लोकांमध्ये कोणतीही भिती निर्माण होणार नाही, यादृष्टीने त्यांना आजारांबाबतची शास्त्रीय माहिती व शास्त्रशुध्द उपाययोजना आरोग्य शिक्षणाव्दारे तसेच समुपदेशनाव्दाने देण्यावर भर द्यावा, संपूर्ण आरोग्य यंत्रणा दक्ष आणि सजग ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना रुग्णांची काळजी घेतांना आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आपली स्वत:चीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाबाबतच्या उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात, असेही ते म्हणाले.
औषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही.बनसोडे यांनी कोरोना संशयित रुग्ण, त्यांची लक्षणे तसेच अलगीकरण कक्षातील रुग्णांबाबत घ्यावयाची काळजी तसेच शुगर,बीपी, कॅन्सर, अतिस्थुलत्व, हदयरोग अशा विविध व्याधीग्रस्त रुग्णांनी आणि रुग्णांबाबत काय काळजी घ्यायची याविषयी सविस्तर माहिती दिली. रुग्णांच्या लक्षणानुसार तसेच आजारांबाबतीत पूर्वइतिहासानुसार उपचार तसेच वारंवार मॉनिटरींग याबाबत छोटया-छोटया उदाहरणासह माहिती दिली. तसेच सारी आजाराबाबतही आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याची सूचना केली.
क्षयरोग व उरोरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सायबन्नावार यांनी कोव्हिड केअर सेंटरमधील व्यवस्थापनविषयक सविस्तर माहिती दिली. रुग्णांची लक्षणे, वय तसेच इतर व्याधींचा विचार करुन उपचार आणि काळजी घेण्याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये काम करतांना डॉक्टर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी कोणत्या दक्षता घ्याव्यात याविषयी माहिती दिली.
बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुधीर सरवदे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने संशयित बाल रुग्णाची तसेच माता व बाळ यांची घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. बालकांसाठी लक्षणानुसार उपचार पध्दती राबवितांना डायटकडे तेवढेच लक्ष देणे गरजेचे असून बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबाबतही अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना आणि अडीअडचणींना तज्ञांनी उत्तरे देऊन त्यांचे शंकासमाधान केले.यामध्ये मेडिसिन असोसिएट प्रोफेसर डॉ. सौ. परितेकर यांच्यासह सर्वच तज्ञांनी सहभाग घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केंम्पीपाटील अणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही या व्हीसीमध्ये सहभाग घेऊन महिती दिली.
प्रारंभी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी व्हीसीव्दारे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली..
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.