इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ मे, २०२०

कोव्हिडसाठी सलग 7 दिवस सेवा देणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना 2 तर उच्च पदवीधरांना 3 हजार प्रती दिन - जिल्हाधिकारी दौलत देसाई



       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड-19 या रोगाच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सलग 7 दिवस कर्तव्यावर असणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रती दिन 2 हजार रुपये तसेच उच्च पदवीधरांना प्रती दिन 3 हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
       जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी आज खासगी डॉक्टरांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, अशा साथीच्या रोगाच्या निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून  खासगी डॉक्टरांनी ऐच्छिक सेवा बजावावी. जिल्हा प्रशासनाकडू त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. सलग 7 दिवस कर्तव्यानंतर पुढील 7 दिवस अलगीकरण अशा स्वरुपाचे नियोजन  अपेक्षित आहे. अपवादात्मक प्रकरणात 3 ते 4 दिवसांची सेवाही स्वीकारली जाईल. यासाठी पदवीधर डॉक्टरांना प्रती दिन 2 हजार रुपये तसेच उच्च पदवीधरांना प्रती दिन 3 हजार रुपये मानधन दिले जाईल.
            समाजासाठी कर्तव्य म्हणून आपत्कालीन सेवा देण्याची संधी 100 वर्षातून एकदा मिळाली आहे. जिल्हाधिकारी म्हणून मला ही संधी मागील वर्षी महापुरामुळे व यावर्षी कोव्हिड-19 मुळे मिळाली आहे. त्यामुळे खचून न जाता या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एक झाले पाहिजे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेवाभावी वृत्तीने कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक एकत्र येण्याचे हे एकमेव उदाहरण असेल. कोल्हापुरकर संकटात एक होतात हे महापुराच्यावेळी आपण दाखवून दिले तीच परंपरा पुढे चालू ठेवूया.  यासाठी विना मानधन सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे स्वागतच असेल. तालुका आरोग्य अधिकारी,‍ जिल्हा आरोग्य अधिकारी, उप जिल्हाधिकारी यांनी बजावलेल्या आदेशाचे जे डॉक्टर पालन करत आहेत त्यांना विमा कवच असेल. कर्तव्य बजावत असताना दुर्दैवाने अपघात घडल्यास त्यालाही विमा असेल. डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी त्यांची राहण्याची, जेवणाची व अलगीकरणासाठी व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर त्यांना सुरक्षा किटही दिले जाईल. कोव्हिड-19 साठी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांना विशेष प्रमाणपत्रही जिल्हा प्रशासनामार्फत दिलं जाईल. कोणत्याही डॉक्टरला दुर्दैवाने लागण झाल्यास शासकीय खर्चातून त्यांच्यावर उपचार केले जातील,अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. खासगी पॅरामेडिकल स्टाफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रुग्णवाहिका यांनीही कोव्हिड-19 विरुध्दच्या युध्दात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
            यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, स्वीय सहायक विज्ञान मुंडे आदी उपस्थित होते.
 00 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.