इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३० मे, २०२०

मान्यतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओची कारवाई : यापुढेही तपासणी मोहिम तीव्र करणार -प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस



 कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्हयात लॉकडाऊनच्या काळात मान्यतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या 4 वाहनांवर आरटीओंनी कारवाई केली असून यापुढेही मान्यतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने ऑटो रिक्षा व चारचाकी वाहनातून प्रवासासाठी मान्यता देताना काही अटी घालून दिल्या आहेत. ऑटो रिक्षा व चारचाकी वाहनांमध्ये चालकासह 2 प्रवासी नेण्याला मुभा आहे, चालक व प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक आहे तसेच वाहनांचे निर्जंतुकीकरण वरचेवर करावे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे अशी अटी घालून प्रवाशी वाहतूकीस परवानगी दिली आहे.
या अटींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन तपासणीची विशेष मोहिम हाती घेतली असून आज शासनाच्या अटींचे उलंघन करणाऱ्या 4 वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये MH09 J 5933  रिक्षामधून 10 प्रवासी, MH09 EL 0818 रिक्षामधून 4 प्रवासी, मारुती ओम्नी MH09 Y 0077 मधून 9 प्रवासी , महिंद्रा लोगान कार MH09 DB 0304 मधून 5 प्रवासी वाहून नेताना आढळले, या सर्व वाहनावर मोटर वाहन कायदा व नियमानुसार कारवाई करण्यात आली. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव यांनी ही कारवाई केली.
यापुढेही वाहन तपासणीची विशेष मोहिम जिल्हयात अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सांगून डॉ. अल्वारिस यांनी वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, कोरोनापासून स्वतःला, कुटुंबीयांना व इतरांना वाचवावे, असे आवाहन केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.