इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३० मे, २०२०

सामाजिक संसर्ग रोखणे, मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी ग्राम समित्यांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई



                        


कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये अजून सामाजिक संसर्ग झालेला नाही. येथून पुढेही कोणत्याही प्रकारे सामाजिक संसर्ग होवू द्यायचा नाही आणि आपल्या जिल्ह्यात कमी असणारा मृत्यूदर यापुढेही वाढू द्यायचा नाही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "मी स्वत: सुरक्षित राहणार आणि गावाला सुरक्षित ठेवणार, कोणतीही आपत्ती हरवू शकणार नाही," अशा पध्दतीने सतर्क राहून काम करावे, असा आत्मविश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.
 जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सरपंच, आशा वर्कर, ग्याम समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक,तलाठी, ग्राम विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. 
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने आजपर्यंत चांगल्या पध्दतीने परिस्थिती हातळल्याने त्याचे परिणामही चांगले दिसत आहेत. सर्व तपासलेल्या बाधित रुग्णांना आपण विलगीकरणात ठेवलेले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे. त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानतो. परंतु, आता कोरोना युध्दाच्या वेगळ्या टप्यावर आपण येवून पोहचलो आहोत. गावात एखादी निगेटिव्ह अहवाल घेवून येणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक अथवा गृह अलगीकरणात राहयचं आहे अशा व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत बाहेर फिरु देवू नका. आज तपासणी  अहवाल निगेटिव्ह आला म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असे नाही. बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तीला अलगीकरण बंधनकारक आहे. अशी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना सक्तीने अलगीकरणात पाठवा व कारवाई करा.
 1897, 1920 या साली आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापनाचा वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. त्याचप्रमाणे आजही आपण  कोल्हापूरचे वेगळेपण देशाला दाखवून देवूया. त्याच पध्दतीने सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतोय ही भावना ठेवून प्रत्येकाने काम करावे. अशी संधी क्वचित येते. कोल्हापूरचे हे वेगळेपण राज्याला आणि देशाला दाखवून देवूया.  जिल्ह्यात झालेल्या 4 मृत्यूंपैकी केवळ कोरोनामुळे मृत्यू असा एकही नाही. प्रत्येकाला वेगवेगळी व्याधी होती हे दिसून आले आहे. दोन प्रकरणात मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्थानिक स्तरावरील  संस्थात्मक, गृह अलगीकरणातील व्यक्तींची दररोज एमपीडब्ल्यू ए एन एम, आशा, अंगणवाडी सेविका, खासगी, शासकीय डॉक्टर यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी करा. काही लक्षणे दिसत असतील किंवा व्याधीग्रस्त असतील तर त्यांना तात्काळ सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय आणि जवळच्या कोव्हिड काळजी केंद्रात उपचारासाठी पाठवा.
 माल वाहतूक, दूध वाहतूक टँकर यांच्या चालक, वाहकांसाठी गावामध्ये स्वतंत्र राहयाची व्यवस्था करा, तशी त्यांना कल्पना द्या, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करावी. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून प्रवास करुन येणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्तींचा कुटुंबातील अथवा गावातील लोकांशी संबंध येणार नाही, याची खबरदारी ग्राम समितीने घ्यावी. त्यांच्या कुटुंबाचे व अशा व्यक्तीचे योग्य समुपदेशन करावे.

कोरोना फक्त साबण आणि सॅनिटायझरला घाबरतो
पूर्वीच्या काळी घराबाहेर पाणी भरुन बादली ठेवली जायची. बाहेरुन आलेली व्यक्ती या बादलीतील पाण्याने स्वच्छ हात पाय धुवून घरी येत असे. हीच पारंपरिक पध्दत पुन्हा  एकदा आपल्याला लागू करावी लागेल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना फक्त साबण आणि सॅनिटायझरला घाबरतो. पाण्याच्या बादलीसह सोबत साबण ठेवा. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला साबणाने स्वच्छ हात पाय धुवून घरी येण्यास बंधनकारक करा. शक्य असल्यास घरीही सॅनिटायझर ठेवा. गावामध्ये फिरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे तो वापरावा. कुटुंबियातील ज्येष्ठ, व्याधीग्रस्त आणि लहान मुलांना अजिबात बाहेर पाठवू नका. सामाजिक संसर्ग होणार नाही यासाठी जागरुक रहायला हवे, असा संदेशही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिला.

 मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यावेळी म्हणाले,  बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्या लोकांच्या घरी नियमांचे व्यवस्थित पालन होत असेल, स्वतंत्र जागा असेल अशांना घरी अलगीकरण करा. लक्षणं असतील त्यांचे स्वॅब घेवून त्यांना संस्थात्मक अलगीकरणात पाठवा. ग्राम पंचायतीमार्फत आयुषचे सर्व्हेक्षण करावे. 50 वर्षापुढील तसेच संस्थात्मक आणि गृह अलगीकरणातील व्यक्तींना संजिवनी वटी आणि आर्सेनिक अल्बम-30 औषधांचे वाटप करा. व्याधीग्रस्त व्यक्तींचे पल्स ऑक्झीमीटर, थर्मल स्कॅनिंग, दैनंदिन तपासणी झाली पाहिजे. त्यांचे रिडींग 95 च्या खाली आल्यास पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करा. कोरोनाबरोबरच आपल्याला डेंग्यू, उष्माघात, स्वाईन फ्ल्यू याबाबतही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी संस्थात्मक अलगीकरण केंद्रात पाण्याची व्यवस्था करा. घरा घरात डेंग्यूसाठी कोरडा दिवस पाळा, डासांसाठी फवारणी करा, परिसर स्वच्छ ठेवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, येथून खडतर कालावधी आहे. येणारा पावसाळा आणि सामाजिक संसर्ग याबाबत आपल्याला दक्षता घ्यावी लागणार आहे. संस्थात्मक अलगीकरणातील प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे. त्याबाबत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही आवाहन केले आहे. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद येत आहे. व्याधीग्रस्त व्यक्तींना तपासणीसाठी नजिकच्या कोव्हिड काळजी केंद्राकडे आणायचे आहे. ग्राम समितीने पाहणी करुन स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल तरच त्या व्यक्तीला गृह अलगीकरणात ठेवायचे आहे. अंगणवाडी सेविका, ए एन एम, आशा वर्कर यांनी प्रभावीपणे सर्व्हेक्षण करावे तरच पुढचा धोका टळणार आहे, असेही ते म्हणाले.
 यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
0 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.