इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ मे, २०२०

3 मे नंतर बाधित जिल्ह्यांमधून 30 हजार आले; साडेसतरा हजार जणांची स्वॅब तपासणी जिल्ह्यात 483 पॉझिटिव्ह; अलगीकरणातील व्याधीग्रस्तांची विशेष काळजी घ्या - जिल्हाधिकारी दौलत देसाई




     
-          
       कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : पुणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, सोलापूर आणि सांगली या बाधित जिल्ह्यांमधून 3 मे नंतर अंदाजे 30 हजार व्यक्ती जिल्ह्यामध्ये आल्या. जिल्हा प्रशासनाने साडेसतरा हजार व्यक्तींच्या स्वॅब तपासणी केली. यामध्ये आजअखेर 483 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या त्यांच्यावर सीपीआर,    डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय तसेच कोव्हिड काळजी केंद्रात उपचार सुरु आहेत. ज्या व्यक्ती संस्थात्मक आणि गृह अलगीकरणात आणि व्याधीग्रस्त आहेत, अशा व्यक्तींची विशेष काळजी प्रभाग तसेच ग्राम समितीने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
       जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात आलेल्या 483 पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी इतर सर्व व्यक्तींना प्रत्येक गावातील संस्थात्मक अलगीकरण, तालुक्याच्या ठिकाणी असणारे केंद्रीय संस्थात्मक अलगीकरणात आहेत. स्वतंत्र राहण्याची सोय असणाऱ्या व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  उपचारार्थ दाखल पॉझिटिव्ह रुग्णांची काळजी शासकीय तसेच खासगी डॉक्टर्स घेत आहेत. संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषत: मधुमेह, ह्दयविकार, मूत्रपिंड, रक्तदाब, कर्करोग अशा व्याधीग्रस्तांची ग्राम समितीने विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आशा वर्करमार्फत या सर्वांची आपण सर्व्हेक्षण करत आहे. अशा व्यक्ती गावात बाहे पडणार नाहीत किंवा गावात आलेल्या व्यक्ती या व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
            483 बाधित व्यक्तींचा आकडा मर्यादित ठेवायचा असेल आणि जिल्ह्यातील नागरिकांना सामाजिक संसर्ग होवू द्यायचा नसेल तर आता ग्राम समिती आणि प्रभाग समिती यांच्यावर फार मोठी जबाबदारी आली आहे. संस्थात्मक तसेच गृह अलगीकरणात असणाऱ्या व्यक्ती त्याच ठिकाणी कशा राहतील कोणत्याही परिस्थितीत बाहेर फिरणार नाहीत, समाजात मिसळणार नाहीत याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे. या व्यक्तींचा आप आपसातही संपर्क येणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल. यातील एकही व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली तर सर्वांची तपासणी करणं आवश्यक होईल. 
             अलगीकरणात असणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांच्या वस्तू एकमेकाला देवू नये, अथवा बाहेर गावाहून आणलेल्या वस्तू कुटुंबाला देवू नये. ग्राम समितीने या व्यक्तींना सुविधा पुरविणे आवश्यक आहे. जेवण डिस्पोजेबल कंटेनरमधून दिलं पाहिजे. घरच्या व्यक्तींशी संपर्क येता कामा नये याची दक्षता ग्राम समितीने घ्यावी. सामाजिक अंतर हे संस्थात्मक तसेच गृह अलगीकरणातील व्यक्तींने ठेवले पाहिजे. हे जर पाळले नाही तर पुढे  ती व्यक्ती बाधित झाली तर कुटुंबातील इतर व्यक्तींना त्याचा प्रादुर्भाव होवू शकतो आणि कुटुंबातील इतर व्यक्ती गावातील व्यक्तींच्या संपर्कात आल्यास त्यांना प्रादुर्भाव होवू शकतो. संस्थात्मक अलगीकरणातील  प्रत्येक व्यक्तीची रोज वैद्यकीय तपासणी होते की नाही याची खात्री ग्राम समितीने करावी. संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील स्वच्छतागृहे सोडियम हायफोक्लोराईड सोल्यूशनने निर्जुंतूकीकरण ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करावे. घाबरुन न जाता या सर्वांबाबत आपण काळजी घेतली तर सामाजिक संसर्गाचा धोका होणार नाही. ग्राम समिती याबाबत निश्चित चांगलं काम करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.