इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २८ मे, २०२०

कोव्हिड काळजी व अलगीकरण केंद्रातील प्रत्येकाचे वैद्यकीय स्क्रिनिंग करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई



-          
       कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हिड काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील प्रत्येक व्यक्तीचे थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर याच्या माध्यमातून तपासणी करा. व्याधीग्रस्त व वयोवृध्‍द व्यक्तींची विशेष काळजी घ्या. सीपीआर व डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाकडे संदर्भीत करा. जिल्हा कोव्हिड आरोग्य केंद्रात किमान 50 टक्के खाटांसाठी प्राणवायू पुरवठ्याची सोय करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.
            जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी तालुकानिहाय आढावा घेवून ते म्हणाले, रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद तपासणी नाक्यांवर घेतली जाते. त्याचबरोबर ती प्रत्येक कोव्हिड काळजी केंद्रात पाठवली जाते. नाक्यांवरुन आलेल्या नोंदीनुसार व्यक्ती सीसीसीमध्ये आलेत का, याची तपासणी झाली पाहिजे. ती चौकशी करुन संबंधित व्यक्तींना आयक्यूमध्ये ठेवले पाहिजे. सीसीसीमधील व्यक्तींची तपासणी करुन त्यांना न्युमोनिया, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार अशा व्याधीग्रस्त व्यक्तींना सीपीआर तसेच डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवावे. पॉझिटिव्ह रुग्णांच्याबाबतीत काँन्टॅक्ट ट्रेसिंग करताना अतिशय जलद आणि काटेकोरपणे करावी. सतर्क राहून अशा पध्दतीने काम केल्यास मृत्यूदराचा धोका आपण थांबवू शकू.
            जिल्हा कोव्हिड आरोग्य केंद्रामधील किमान 50 टक्के खाटांसाठी प्राणवायू पुरवठ्याची छोट्या सिलेंडर आणि मास्कच्या माध्यमातून यंत्रणा उभी करा. संस्थात्मक अलगीकरण आणि गावांमधील अलगीकरण केंद्रातील व्यक्तींसाठी डॉक्टरांनी भेट द्यायला हवी. आरोग्य सेतू हे ॲप डाऊलोड करायला सांगा. या ॲपच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळू शकते. सीसीसी आणि आयक्यूमध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक तपासणीसाठी पीपीई किट वापरावा. कोरोना बरोबरच मलेरिया, डेंग्यू, स्वाईनफ्यू यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून काम करावे. यासाठी डास निर्मुलन उपाय योजना कराव्यात. येवू घातलेली टोळधाड, बियाणे, खते याबाबत शेतकऱ्यांना खरीप हंगामात अडचण होणार नाही. तसेच पीक कर्ज वाटपाबाबतही बँक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे आढावा घेवून यंत्रणा सतर्क करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
            महापालिका आयुक्त डॉ. मलिनाथ कलशेट्टी म्हणाले, डेंग्यूच्या उच्चाटनासाठी कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. त्यावर भर द्यावा. ग्राम पंचायतींना फॉगिंग यंत्र देण्यात आले आहे. त्याचा वापर करुन डास निर्मूलन करावे. संस्थात्मक अलगीकरणाचा परिसर स्वच्छ असायला हवा. त्याबाबत काळजी घ्या.
            मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, कोव्हिड काळजी केंद्र, संस्थात्मक अलगीकरण यामध्ये सुविधा देवून पूर्ण क्षमतेने कार्यरत करा. पल्स ऑक्सीमीटर वर रिडिंग घेवून नोंद ठेवा. नरेगामधून पंतप्रधान आवास योजनेमधील घरे अंतिम करा.
           






टोळधाड आपत्तीसाठी तयार रहा- ज्ञानदेव वाकुरे
        जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी यावेळी जिल्ह्यात येवू घातलेल्या टोळधाडी विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, टोळधाड दिवसा दिसत नाही. त्यासाठी रात्री दक्ष रहावे. हिरव्या मोठ्या झाडांवर थवा करुन बसते. आस्का लाईटच्या माध्यमातून ही दिसते. अग्नीशामन दल तसेच ट्रॅक्टर माऊंटेड फवारणी यंत्राद्वारे यावर फवारणी करावी. त्यासाठी क्लोरोपायरीफॉसेसचा वापर करावा.
            शेतकऱ्यांनी बियाणांची पावती घ्यावी. त्यावर दुकानदार आणि शेतकऱ्याची सही असावी. भरारी पथकाने याबाबत तपासणी करावी.   
           
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.