मंगळवार, १४ जुलै, २०२०

इचलकरंजीचे आयजीएम कोव्हिड रुग्णालय म्हणून जाहीर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश



कोल्हापूर,दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) :  इचलकंरजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेसहित आजपासून पुढील आदेशापर्यंत पुर्णवेळ विलगीकरण रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले.
इचलकंरजी नगरपालिका, शिरोळ व हातकणंगले तालुक्यामधील गावांमध्ये आढळून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक असल्याने कोविड-19 आजाराच्या  रुग्णांच्या उपचारासाठी पूर्णवेळ विलगीकरण रुग्णालय असणे आवश्यक त्यानुसार आज आयजीएम रुग्णालय पूर्णवेळी विलगीकरण रुग्णालय म्हणून आज आदेश देण्यात आले.
 इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय विलगीकरण रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात आल्याने कोरोना विषाणू संशयित रुग्ण तपासणी व औषधोपचार वगळता इतर सर्व आजाराचे बाहय रुग्ण, आंतररुग्ण, तातडीच्या वैद्यकीय सेवा या रुग्णालयात पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र या रुग्णालयातील बाह्य रुग्णसेवा याच ठिकाणी स्वतंत्र कक्षात पुढील आदेशापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय, हातकणंगले / महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालये, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या धर्मादाय रुणालयाकडे स्थलांतरीत करावी व येणाऱ्या सर्व रुग्णांवर संबंधित योजनेतील खाजगी /धर्मादाय रुग्णालयांनी मोफत उपचार करावेत.
श्वान दंश, विंचू दंश, सर्प दंश यासाठी लागणारी सर्व औषधे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय यांनी रुग्ण उपचार घेत असलेल्या योजनेतील खाजगी / धर्मादाय रुग्णालय यांना उपलब्ध करुन देण्याचे आहेत.
न्याय वैद्यकीय प्रकरणातील रुग्णांची तपासणी व उपचार ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे करण्याचे आहे. याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे. त्याच प्रमाणे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालया  मृत देहावरील न्याय वैद्यकीय पोस्टमार्टम सेवा, औषध विक्री सेवा व इतर लॅब्स प्रमाणे सुरू राहतील. या बाबतचे सर्व नियोजन जिल्हा शल्य चिकित्सकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना नेमून द्यावे.
सद्यस्थितीत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील आंतररुग्ण विभागातील व तातडीचे वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांची व्यवस्था इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाने करावयाची असून कोव्हीड रुग्णालयास आवश्यक विशेष तज्ज्ञ व इतर वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांच्या अधिनस्त इतर रुग्णालयामधून पाळी-पाळीने उपलब्ध करून घ्यावेत. त्याचप्रमाणे खाजगीरित्याही तात्पुरत्या स्वरूपात अशा विशेष तज्ज्ञांची व वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करून घेण्यात यावी. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी  हातकणंगले व शिरोळ परिसरातील खाजगी/ धर्मादाय रुग्णालय व वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचेसमवेत बैठक आयोजित करून नियोजन  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिले आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.