इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेस जिल्हा नियोजन समितीतून 18 लाखाचा निधी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील





            कोल्हापूर, दि. 11 : सामाजिक परिवर्तनाचे महत्वकांशी कार्य करणाऱ्या जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून 18 लाखाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.
            जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्यावतीने मंगळवार पेठ येथे बांधण्यात आलेल्या डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्णण निरीक्षण गृह इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अश्विनी रामाणे, दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
            जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी शासनाकडून सर्वती मदत केली जाईल. याबरोबरच सेवाभावी संस्था आणि व्यक्तींच्या लोकसहभागातूनही संस्थेचे विविध उपक्रम हाती घेऊन संस्थेला बळकटी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  संस्थेचे प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.
            याप्रसंगी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्यावतीने सामाजिक काम केले जात असून या संस्थेच्या विकासासाठी 10 लाखाचा निधी खासदार फंडातून उपलब्ध करुन दिला जाईल. या निधीचा विनियोग संस्थेतील मुलांसाठी अद्ययावत डिजिटल लायब्ररी उभारण्यासाठी करावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
            याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या वतीने  अनेकविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असून या पुढील काळात जिल्हा नियोजन समिती, शासन आणि दानशुर संस्था आणि व्यक्तींची मदत घेऊन नवे-नवे उपक्रम हाती घेतले जातील. संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींचे त्यांनी कौतुक केले. 
            प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपुरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी पद्मजा तिवले यांनी आभार मानले. समारंभास महिला व बाल विकास अधिकारी एस.डी.मोहिते, शिवाजीराव कदम, माजी महापौर भिकसेठ पाटील, व्ही.बी.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विद्यार्थी, पालक आणि नागरीक उपस्थित होते.
            या  प्रसंगी जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या इमारत उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.