इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

स्तनांच्या कर्करोगाचे दहा मिनिटात निदान सीपीआरमध्ये महिनाभर मोफत तपासणी





कोल्हापूर दि. 7: केवळ दहा मिनिटात स्तनांच्या कर्करोगाचे निदान होवून स्मार्टफोनवर रिपोर्ट मिळण्याची सुविधा छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात करण्यात आली आहे. पर्यावरण स्नेही क्ष-किरण विरहित यंत्राद्वारे स्तनांच्या कर्करोगाची आजपासून महिनाभर मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
जागतिक स्तन कर्करोग जागृती अभियान 2016 अंतर्गत शासनाचा वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग इम्पॅथी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात स्तनांचा कर्करोग तपासणी अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भगिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मधुरिमा राजे, उपमहापौर शमा मुल्ला, डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिषीर मिरगुंडे, डॉ. माधवी लोकरे, मानवी करंबळे, मनिषा गायकवाड, अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, डॉ. ज्योत्स्ना देशमुख, अधिसेविका दीप्ती नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वैशाली क्षिरसागर म्हणाल्या, कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिला स्वत:ची काळजी घेण्यात हलगर्जीपणा करतात. महिलांनी आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घेतली पाहिजे.
मधुरिमाराजे म्हणाल्या, गरीब महिलांना मोठ्या दवाखान्यांचे खर्च परवडणारे नाहीत. त्यामुळे त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात महिनाभर मोफत चालणाऱ्या या अभियानाचा लाभ घ्यावा. उपमहापौर शमा मुल्ला म्हणाल्या, कर्करोग हा मोठा रोग आहे हा गैरसमज महिलांनी मनातून काढून टाकावा. कर्करोगावर उपचार आहेत तो बरा होतो.
डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले, योग्यवेळी निदान झाल्यास कर्करोग आटोक्यात येवू शकतो. बरा होवू शकतो. कर्करोग्यांची वाढती संख्या, यामुळे मुंबईच्या टाटा ममोरियल रुग्णालयावर येणारा ताण लक्षात घेवून जिल्हास्तरावर रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी गतवर्षी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात 300 च्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महिनाभर चालणाऱ्या या अभियानाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स यांच्यासह महिला रुग्ण उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.